
जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिया प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामाचा थरार नुकताच संपला. अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात टायटन्स संघाचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले. यंदाच्या हंगामामध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. जवळपास प्रत्येक लढतीमध्ये गोलंदाजांची धुलाई झाली आणि 200, 250 धावांचा डोंगर उभा राहिल्याचे दिसले. आता यावरून नवीन वादाला तोंड फुटले असून इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू लियाम लिव्हिंगस्टन याने स्पष्ट शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली आहे.
लियाम लिव्हिंगस्टन याला सनरायझर्स हैदराबाद संघाने तब्बल 13 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. हैदराबादच्या संघात इतरही बडे खेळाडू असल्याने त्याला बराच काळ बेंचवर बसावे लागले. अवघ्या दोन लढतींमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. मात्र यातही तो काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याला फक्त 15 धावा काढता आल्या. आता आयपीएल संपल्यानंतर त्याने खेळपट्ट्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
आयपीएलमधील सपाट खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे खूप सोपे झाले असून एकामागोमाग एक षटकारांचा पाऊस पडताना पाहणे अत्यंत कंटाळवाणे झाले आहे. यात गोलंदाजांना आपले कौशल्य दाखवण्यास कोणतीही जागा उरली नाही, असे तो म्हणाला. यासाठी त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या लढतीचाही दाखला दिला.
मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेले 230-40 धावांचे आव्हान आम्ही 18 व्या षटकात पार केले. खरे सांगायचे तर हे सगळे खूप कंटाळवाणे वाटू लागले आहे. फक्त षटकार खेचताना पाहण्यात कोणतेही खरे कौशल्य दिसून येत नाही. खेळपट्ट्या इतक्या सपाट केल्या जातात आणि त्यात ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा नियम असल्याने फलंदाजांना मोकळे रान मिळते. मुंबईत चेंडू हवेत खूप वेगाने ट्रॅव्हल करतो, तर हैदराबादमध्ये एकाच खेळपट्टीवर 5 ते 6 सामने खेळवले गेले, असे लिव्हिंगस्टन म्हणाला.
यंदाच्या हंगामात विक्रमी वेळा 200 हून अधिक धावा बनल्या. तसेच 17 वेळा 200 हून अधिकांचा यशस्वी पाठलागही झाला. राजस्थानचा 15 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी याने एकट्याने 72 षटकार ठोकले आणि आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही केला. त्याच्या या खेळीचे लिव्हिंगस्टन यानेही कौतु केले. मी गेल्या 7 वर्षांपासून आयपीएल खेळतोय. या काळात मी अनेक दिग्गज खेळाडूंसोबत आणि त्यांच्याविरुद्ध खेळलो आहे. पण 15 वर्षांच्या वैभवसारखी प्रतिभा मी आजवर पाहिलेली नाही. तो ज्या ताकदीने आणि अचूकतेने चेंडू फटकावतो, ते अद्भूत आहे. संपूर्ण स्पर्धेत त्याचा एकही शॉट मिस-टाईम झाला नाही, असे कौतुक त्याने केले.
स्पर्धेच्या सुरुवातीला आम्ही त्याला पहिल्याच चेंडूवर बाउन्सर टाकून बाद केले होते. पण त्यानंतर त्याने स्वतःमध्ये जे बदल केले ते अफाट होते. स्पर्धेच्या शेवटी जेव्हा आम्ही त्याला बाउन्सर टाकला, तेव्हा त्याने तो थेट थर्ड मॅनवरून षटकार मारला. फुल लेंथ चेंडू आणि यॉर्कर्सवरही त्याने मैदानाच्या चारी बाजूंना फटकेबाजी केली. शेवटी एक गोलंदाज म्हणून ‘आता याला चेंडू टाकायचा कुठे?’ असा प्रश्न आम्हाला पडायचा, असे म्हणत लिव्हिंगस्टनने वैभवचे कौतुक केले.


























































