
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महिला व बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या प्रश्नावरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS-6) आकडेवारीमुळे भाजप सरकारची निष्क्रियता उघड झाली असल्याचा आरोप त्यांनी सामाजिक माध्यमांवरील पोस्टमधून केला.
खरगे यांनी म्हटले की, मोदी सरकारने केवळ महिला आणि बालकांच्या आरोग्य व पोषणाच्या बाबतीत देशाशी विश्वासघात केला नाही, तर आपले अपयश लपवण्यासाठी महत्त्वाची आकडेवारीही दडपून ठेवली आहे.
एनएफएचएस-६च्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी देशातील कुपोषणाची गंभीर स्थिती अधोरेखित केली. त्यांच्या मते, देशातील प्रत्येक पाच मुलांपैकी एक मूल तीव्र कुपोषणाने ग्रस्त आहे. तसेच एकतृतीयांश हिंदुस्थानी मुले कमी वजनाची आहेत. ६ ते २३ महिन्यांच्या वयोगटातील ८४ टक्क्यांहून अधिक बालकांना पुरेसे पोषण मिळत नाही, असा दावाही त्यांनी केला.
महिलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करताना खरगे म्हणाले की, एनएफएचएस-५नुसार १५ ते ४९ वर्षे वयोगटातील ५७ टक्के महिला रक्तक्षयाने (अॅनिमिया) ग्रस्त आहेत, तर प्रत्येक पाच महिलांपैकी एक महिला कुपोषित आहे.
यावेळी त्यांनी भाजपवर आकडेवारी दडपल्याचा आरोप करत सरकारच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला. भाजपने आपल्या अपयशांवर पडदा टाकण्यासाठी पाच सूत्री धोरण अवलंबल्याचा आरोप त्यांनी केला.
खरगे यांच्या मते, या धोरणात निवडक आकडेवारी दडपणे, दुर्बल घटकांकडे दुर्लक्ष करणे, ‘सबका साथ’ आणि ‘अमृत काल’ यांसारख्या घोषणांची जाहिरातबाजी करणे, वास्तव परिस्थितीबाबत वेगळी प्रतिमा निर्माण करणे आणि कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे संरक्षण करणे यांचा समावेश आहे.
महिला आणि बालकांच्या पोषणासंदर्भातील आकडेवारीवरून केंद्र सरकार आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
Not only does the Modi Govt betrays India’s women and children on healthcare and nutrition, but it also deliberately hides crucial data which exposes its failures!
Absolute incompetence of the BJP has been unmasked by the NFHS-6 data!
🧑🧒1 in 5 children suffer from acute… pic.twitter.com/SIuBJxVpqc
— Mallikarjun Kharge (@kharge) June 4, 2026

























































