
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील जेवणात किटक, झुरळ, माशा आढळल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. या घटनांतर रेल्वेतील अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी आयआरसीटीसीने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयआरसीटीसी आता एआय कॅमेऱ्यांच्या साहाय्याने स्वयंपाकघरांवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. आयआरसीटीसीच्या मुख्य स्वयंपाकघरांमध्ये एआय-आधारित देखरेख प्रणाली लागू करण्यात आली असून, या माध्यमातून देशभरातील स्वयंपाकघरांमधील अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर चोवीस तास देखरेख ठेवली जात आहे.
आयआरसीटीसी 2,394 एआय-आधारित कॅमेऱ्यांच्या मदतीने देशभरातील 800 हून अधिक स्वयंपाकघरांवर देखरेख ठेवत आहे. दिल्लीतील एका केंद्रीय वॉर रूममधून यावर देखरेख ठेवली जाते. एआय कॅमेऱ्यांमार्फत ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या स्वच्छतेवरही लक्ष ठेवले जात आहे. एआयच्या माध्यमातून अस्वच्छ अन्न, हेअरनेट आणि पारदर्शक हातमोज्यांचा वापर, स्वच्छता आणि फरशी पुसणे, तसेच उंदीर, माशा आणि झुरळांची उपस्थिती अशा एकूण नऊ प्रकारच्या त्रुटी ओळखल्या जात आहेत.
एआय प्रणाली कशी काम करते?
आयआरसीटीसीने स्वयंपाकघरातील अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सुमारे अडीच वर्षांपूर्वी ही प्रणाली सुरू केली. कॅमेऱ्यांना जेव्हा नियमांमध्ये कोणतेही उल्लंघन आढळते, तेव्हा स्वयंपाकघर व्यवस्थापकाला त्वरित एक संदेश पाठवला जातो. जर वेळेवर समस्येचे निराकरण केले नाही, तर प्रकरण वरिष्ठांकडे पाठवले जाते. जबाबदार व्यक्तीवर साधारणपणे दोन तासांच्या आत कारवाई केली जाते, असे आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
हे कॅमेरे दररोज सरासरी सुमारे 350 अलर्ट देतात. गेल्या एका महिन्यात एकूण 13,550 सूचना प्राप्त झाल्या, त्यापैकी सर्वाधिक 4 हजार 123 उत्तर विभागात, 3 हजार 205 पूर्व विभागात, 2 हजार 687 पश्चिम विभागात, 2 हजार 226 दक्षिण मध्य विभागात आणि 1 हजार 309 दक्षिण विभागात नोंदवण्यात आल्या.



























































