Indonesia Open 2026 – हिंदुस्थानच्या हरिहरन आणि अर्जुनची धडाकेबाज कामगिरी, पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडोनेशिया ओपन २०२६ बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानच्या हरिहरन अम्सकरुणन आणि एम. आर. अर्जुन या पुरुष दुहेरी जोडीने चमकदार कामगिरी केली आहे. जकार्ता येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत, हिंदुस्थानी जोडीने एका गेमने मागे पडल्यानंतरही जबरदस्त पुनरागमन करत मलेशियाच्या उच्च मानांकित अ‍ॅरॉन ताई आणि कांग खाई झिंग या जोडीचा पराभव केला. या अटीतटीच्या विजयासह हरिहरन आणि अर्जुनने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ‘बीडब्ल्यूएफ (BWF) सुपर १०००’ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टर फायनल) प्रवेश मिळवला आहे.

या चुरशीच्या सामन्यात हिंदुस्थानी जोडीने मलेशियाच्या जोडीवर १६-२१, २१-१५, २१-१९ असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी दुसऱ्या गेमच्या मध्यापासून सामन्यावरील पकड मजबूत केली आणि सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला. तिसऱ्या गेममध्येही एकवेळ ते १६-१७ असे मागे होते, परंतु मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत त्यांनी ४८ मिनिटांत या विजयावर शिक्कामोर्तब केले. जागतिक क्रमवारीत ३० व्या स्थानावर असलेल्या या जोडीने यापूर्वी थॉमस कप २०२६ मध्ये कांस्यपदक विजेत्या हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना मलेशियाच्याच गोह झे फेई आणि नूर इझुद्दीन या सातव्या मानांकित जोडीशी होईल.

दुसरीकडे, हिंदुस्थानसाठी या स्पर्धेतून काही निराशाजनक बातम्याही आल्या. महिला एकेरीत स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूला अव्वल मानांकित अ‍ॅन से यंगविरुद्ध १७-२१, १५-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. तर पुरुष एकेरीच्या सामन्यात हिंदुस्थानच्या आयुष शेट्टीला हाँगकाँगच्या ली च्युक यियूकडून २१-१६, १३-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागल्याने त्याचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.