
पश्चिम बंगालमध्ये प्रति बाबरी उभारण्याची घोषणा करणारे आमदार हुमायूं कबीर यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. ‘रेजीनगर मतदारसंघातून लढा. मी तुम्हाला विजय मिळवून देईन,’ अशी ऑफरच त्यांनी दिली आहे. हुमायूं कबीर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आम जनता उन्नयन पार्टीची स्थापना केली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर आणि नावदा या दोन जागांवर त्यांनी निवडणूक लढवली व जिंकूनही आले. तर, ममता बॅनर्जी यांचा कोलकात्यातील भवानीपूर मतदारसंघातून पराभव झाला होता. विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे पुन्हा विधानसभेत जाण्यासाठी ममतांना पोटनिवडणूक लढवावी लागणार आहे.
































































