कचराकोंडीने शाहापूरकर घुसमटले; ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीने डोके उठले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाच्या चटक्यांमुळे सर्वजण हैराण झाले असतानाच कचराकोंडीने शाहापूरकर घुसमटले आहेत. रस्ते, बाजारपेठ, मोकळ्या जागा, खड्डे अशा मिळेल त्या ठिकाणी नागरिक कचरा फेकत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीने डोके उठले असून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोणत्याही क्षणी पावसाळा सुरू होणार असल्याने त्यापूर्वी कचरा उचलणे गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यात रोगराईला आमंत्रण मिळणार आहे. लवकरात लवकर युद्धपातळीवर सफाई मोहीम हाती घ्यावी अशी मागणी शाहापूरवासीयांनी नगरपंचायतीकडे केली आहे.

आदिवासीबहुल तालुका अशी ओळख असलेल्या शाहापूरचे गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर नागरीकरण सुरू आहे. नगरपंचायतीअंतर्गत ११० ग्रामपंचायती असून साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःचे डम्पिंग ग्राऊंडच नाही. मनमानीपणे कोणत्याही जागेवर कचरा टाकला जात असल्याने शहर विद्रूप होत चालले आहे. शाहापूर नगरपंचायतीबरोबर वाशिंद, शाहापूर, खातीवली, कवडे, बोरशेती, आसनगाव, गोठेघर, चेर्पोली, खर्डी, आयरेगाव व कसारा येथील नागरीकरण होत असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. मात्र तेथील रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग निदर्शनास येत आहेत.

ग्रामपंचायतींना घनकचरा टाकण्यासाठी डम्पिंग यार्ड नसल्याने येथे निर्माण होणारा कचरा खेड्यापाड्यांत, चौकाचौकात टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

शाहापूरची कचराकोंडी झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत लाखो रुपये खर्च होतात पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच होत नाही.

शाहापूर तालुक्यात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी डम्पिंग ग्राऊंड उपलब्ध झाल्यास कचरा एकाच ठिकाणी जमा करून त्यावर प्रक्रिया करता येऊ शकते. यासाठी शासनाने शाहापूर तालुक्यासाठी स्वतंत्र डम्पिंग ग्राऊंड तयार करावे.
बाळा धानके, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख