पनवेलमध्ये चाललंय तरी काय? तीन भयंकर घटनांनी नागरिक हादरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल परिसरात तीन गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्याने नागरिक हादरले आहेत. पनवेल शहर, खारघर आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत या घटनांची नोंद झाली असून यामध्ये मृत अर्भकाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, एका अल्पवयीन विकलांग मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा प्रकार आणि सात वर्षांच्या बालिकेशी अश्लील कृत्य केल्याच्या घटनेचा समावेश आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटना पाहून पनवेलमध्ये चाललंय तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पनवेलमधील लाईन आळी परिसरातील एका खाजगी दवाखान्याच्या शौचालयात पाच ते सहा महिन्यांचे मृत अर्भक फिनाईलयुक्त पाण्याच्या बादलीत आढळून आले. एका महिलेने गर्भपात लपवण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा संशय असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक फरार महिलेचा शोध घेत आहे. दुसऱ्या घटनेत खारघर परिसरात एका अल्पवयीन विकलांग मुलीला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. या संवेदनशील प्रकरणात खारघर पोलिसांनी एका संशयीत नराधमाला अटक केली आहे.

दोन दिवसांची पोलीस कोठडी

दोन घटना ताज्या असतानाच आकुर्ली येथील एका निवासी संकुलात सात वर्षांच्या चिमुरडीशी अश्लील कृत्य करण्यात आले. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील ४० वर्षीय आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लागोपाठ घडलेल्या गंभीर घटनांमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.