
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील एका दुर्गम भागीतील गावातील रहिवाशांवर सशस्त्र हल्लेखोरांनी शुक्रवारी पहाटे हल्ला चढवल्याने एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला.
हा हल्ला लोइबोल खुल्लेन गावात पहाटे ४ च्या सुमारास झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेतखोनगाम हाओकिप, तिनमेरी हाओकिप आणि जांगमिनलाल हाओकिप अशी मृतांची ओळख पटली आहे.
दोन विरोधी गटांमध्ये काही मिनिटे झालेल्या गोळीबारादरम्यान या तिघांचा मृत्यू झाला. गोळीबाराचे आवाज घुमल्याने भयभीत झालेले रहिवासी आपल्या घरातून बाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणाच्या शोधात गावाजवळच्या जंगलाच्या दिशेने पळाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
उपमुख्यमंत्री नेमचा किपगेन यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हे एक अत्यंत दुःखद आणि अस्वीकार्य कृत्य असल्याचे म्हटले आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
दरम्यान, राज्यातील कुकी जमातींची सर्वोच्च संस्था असलेल्या ‘कुकी इन्पी मणिपूर’ने (KIM) देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘निःशस्त्र नागरिकांवर झालेल्या हिंसेच्या या भ्याड कृत्याचा ‘किम’ (KIM) स्पष्ट शब्दांत निषेध करते. निष्पाप लोकांची जाणीवपूर्वक केलेली हत्या आणि घरे तसेच उपजीविकेची साधने उद्ध्वस्त करणे हे मानवी प्रतिष्ठा आणि मूलभूत मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे’, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.




























































