
शाळा व अंगणवाड्यांमधील हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य पथक सध्या ‘पंक्चर’ झाले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या या 28 पथकांना गावोगावी फिरण्यासाठी वाहनेच नसल्याने डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना बसून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 28 आरोग्य पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी विद्यार्थ्यांची तपासणी करून विविध आजारांचे निदान व उपचारासाठी मार्गदर्शन करतात. पनवेल तालुक्यात सर्वाधिक पथके कार्यरत असून उर्वरित तालुक्यांमध्येही गरजेनुसार पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
वाहनांची सुविधा नसतानाही काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा थांबवलेली नाही. अनेक कर्मचारी बस, रिक्षा किंवा खाजगी वाहनांचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. यासाठी होणारा खर्च त्यांना स्वतःच्या खिशातून करावा लागत आहे. शासनाकडून कोणतेही स्वतंत्र प्रवासभत्ते किंवा आर्थिक मदत मिळत नसल्याची खंत कर्मचारी व्यक्त करत आहेत.
पथकांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांचे कंत्राट मार्च 2026 मध्ये संपले आहे. मात्र अद्याप नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने वाहने बंद झाली आहेत. परिणामी पथकांना दुर्गम भागातील शाळा आणि अंगणवाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचीच व्यवस्था करावी लागत आहे.
दोन वर्षांनंतरही निर्णय नाही
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेशनाचा मुद्दाही अजून प्रलंबित आहे. मार्च 2014 मध्ये दहा वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सुमारे 27 महिने उलटूनही त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बालकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाने गांभीर्याने घ्याव्यात, वाहनांची तातडीने व्यवस्था करावी आणि सेवासमावेशनाचा निर्णय मार्गी लावावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.































































