
मी हिंदुस्थानच्या प्रवासावर निघालो असून माझे नशीब देशाच्या संविधानाच्या हवाली करत आहे, असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले. तरुणांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने शनिवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततापूर्ण धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या अवघ्या एक दिवस आधी दीपके हिंदुस्थानकडे रवाना झाले आहेत.
अमेरिकेतील बोस्टन येथे राहणारे अभिजीत दीपके शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास नवी दिल्लीत उतरणार आहेत. त्यानंतर ते प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह अन्य प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जातील. तेथे आंदोलनासाठी आवश्यक असणारी रीतसर परवानगी पोलिसांकडून मागण्यात येणार आहे.
हिंदुस्थानकडे रवाना होण्यापूर्वी अभिजित दीपके यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. “हिंदुस्थानच्या मार्गावर असून आता माझे नशीब संविधानाच्या हाती सोपवत आहे. जय भीम!”, असे अभिजित दीपके यांनी म्हटले.
दरम्यान, बुधवारी संसदेच्या अगदी जवळ असलेल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची पहिली पत्रकार परिषद पार पडली. यावेळी संघटनेचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शनिवारी होणाऱ्या या आंदोलनात सर्व विचारसरणीच्या आणि सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत आहे, असे दास यांनी स्पष्ट केले.
अभिजित दीपके 6 जून रोजी सकाळी 8 वाजता दिल्ली विमानतळावर उतरतील. त्यांनी आपल्या समर्थकांना मोठ्या संख्येने विमानतळावर येऊन त्यांचे स्वागत करण्याचे आवाहन केले आहे. सोनम वांगचुक यांच्यासह तेथे उपस्थित असणारे सर्वजण थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जातील आणि जंतरमंतरवर आंदोलनाची परवानगी मागतील. जंतरमंतर हे आंदोलनासाठीचे हक्काचे ठिकाण आहे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, सर्वच पक्षांतील आंदोलकांचे येथे स्वागत आहे. मात्र, त्यांनी आपल्या पक्षाचे झेंडे किंवा बॅनर्स सोबत आणू नयेत. कारण हा देशातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि तरुण हा या देशातील सर्वात मोठा बहुसंख्य वर्ग आहे. त्यामुळे आम्ही सर्व राजकीय विचारसरणीच्या लोकांना या चळवळीचा भाग होण्याचे आमंत्रण देत आहोत, असे दास यांनी म्हटले.



























































