व्यक्तीपूजा आणि धर्माच्या राजकारणाविरोधात लढा देणार, भाजप सोडल्यानंतर के. अन्नामलाई यांची मोठी घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूतील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आपल्या आगामी राजकीय प्रवासाची अधिकृत घोषणा केली आहे. अन्नामलाई मक्केळ इय्यक्कम’ या नावाने त्यांनी ेक मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ते धर्म व व्यक्तीपूजेच्या राजकारणाविरोधात लढा देणार आहेत. तसेच भविष्यात ही चळवळ राजकीय पक्षात बदलणार असून पुढील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या राजीनामा पत्रात अन्नामलाई यांनी पक्ष नेतृत्वाशी तामिळनाडूतील रणनीतीवरून असलेले मतभेद उघड केले होते. त्यानंतर एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी आपल्या नव्या संघटनेच्या धोरणांची माहिती दिली. “आम्ही एक नवीन राजकीय चळवळ सुरू करत आहोत. आम्ही तामिळनाडूची आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून, त्यासाठी आपल्याला आतापासूनच सज्ज व्हावे लागेल.”

“राजकारणात कायमस्वरूपी नेते, खासदार आणि आमदार असण्याची संकल्पना आम्हाला मोडीत काढायची आहे. तामिळनाडूला आता व्यक्तीपूजेच्या राजकारणातून बाहेर काढून सर्वसामान्यांना राजकारणात आणण्याची गरज आहे” असे अन्नामलाई म्हणाले.

कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी राहिलेल्या अन्नामलाई यांनी २०१९ मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी तरुणांना नेतृत्व प्रशिक्षण देण्यासाठी ‘वी द Leaders फाउंडेशन’ (We The Leaders Foundation) नावाची संस्था सुरू केली होती. त्यांच्या या नव्या ‘अन्नामलाई मक्केळ इय्यक्कम’ चळवळीमध्ये याच फाउंडेशनचे स्वयंसेवक मुख्य भूमिका बजावणार असल्याचे समजते. त्यांनी २०२० मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि अवघ्या वर्षभरातच त्यांच्याकडे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले होते.