
पावसाळा ऐन तोंडावर आला असतानाच वसईतील एव्हरशाईन रस्त्याची ‘सैताना’ ने वाट लावली आहे. सैतानसिंग या ठेकेदाराने निष्कृष्ट दर्जाचे काम केले असून १३ कोटी रुपये खर्चुन बनवलेला रस्त्या बाराच्या भावात गेला आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी खचला असून पावसाळ्यात नागरिक तसेच प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. एव्हरशाईनचा रस्त्यातून पावसाळ्यात चालणेही मुश्कील होणार असून निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वसईवासीयांनी केला आहे.
वसईतील एव्हरशाईन रोड ते वसई उड्डाणपूल रस्ता हा मिठागराला लागून आहे. दरवर्षी पावसाळ्यात दोन ते अडीच फूट पाण्याखाली हा रस्ता जातो. त्याची उंची वाढवण्यात यावी यासाठी महापालिकेने टेंडर काढले होते. जैन कन्स्ट्रक्शन या कंपनीने सात कोटी रुपयांना हे टेंडर घेतले. मात्र त्यानंतर खर्च वाढत गेला. सैतानसिंग नावाच्या ठेकेदाराला हे काम दिल्यानंतर त्यांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे काही महिन्यांतच हा रस्ता उखडला. तर काही ठिकाणी खचला. पालिकेकडून वारंवार जैन कन्स्ट्रक्शन कंपनीला या रस्त्याची डागडुजी करण्याबाबत सांगण्यात आले होते.
- एव्हरशाईन रस्त्याच्या दुर्दशेबाबत जैन कन्स्ट्रक्शन कंपनीला तीन ते चार नोटिसा पाठवल्या. पण या नोटिशीलादेखील कंपनीने जुमानले नाही. अखेर पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेने स्वतःच ठेकेदाराच्या मदतीने रस्ता बनवायला घेतला आहे.
- रस्त्याचा खर्च आता जैन कन्स्ट्रक्शन कंपनीकडून वसूल केला जाईल, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे यांनी दिली. मात्र नागरिकांना पावसाळ्यात जो त्रास होईल त्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
- पालिका स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी करत असून नागरिकांच्या करातून पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. सैतानसिंग ठेकेदाराला पाठीशी कोण घालतो याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाका
एव्हरशाईन रस्त्याची जी दुर्दशा झाली आहे त्याची संबंधित ठेकेदाराने जबाबदारी झटकल्याने काम अर्धवट थांबले आहे. अशा कामचुकार ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वसई विधानसभा जिल्हा सचिव राजाराम बाबर यांनी वसई महापालिकेच्या प्रशासनाकडे केली आहे.
































































