
डोंबिवलीतील मिलापनगर तलावात सनस्ट्रोकमुळे मृत माशांचा खच पडला होता. याबाबतचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले. आज सकाळीच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे ‘स्पॉट’वर धडकले. त्यांनी मिलापनगर तलावाची पाहणी करून स्वच्छतेसोबतच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
उपायुक्त रामदास कोकरे यांनी तलावस्थळी भेट दिल्यानंतर नागरिकांनी तलावाच्या संरक्षणासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी तसेच तलावाची देखभाल, स्वच्छता आणि जनजागृतीसाठी मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनकडे तलाव व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवावी अशी मागणी केली. तर पर्यावरण अभ्यासक राजीव तायशेटे यांनी तलावातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपाययोजना सुचवली. या प्रक्रियेमुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊन तलावातील माशांना आणि कासवांना जीवदान मिळू शकते असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पर्यावरण अभ्यासक विजय घोडेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी विभागप्रमुख राजू नलावडे, केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक नितीन परमार आदी उपस्थित होते.
निर्माल्य, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई
केडीएमसी कर्मचाऱ्यांनी तलाव परिसराची स्वच्छता मोहीम राबवली. तलावातील निर्माल्य, प्लास्टिकसह इतर कचरा तसेच मृत मासे बाहेर काढण्यात आले. तलावातील दूषित पाणी बाहेर काढून टँकरच्या माध्यमातून स्वच्छ पाणी भरले जाणार आहे. तलावात निर्माल्य व कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
































































