
अंबरनाथच्या वडोळ गावातील नगरपालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असूनही संबंधित ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचा आरोप भाजप नगरसेवक मनीष म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी त्यांनी नगरपालिकेकडे केली आहे. सत्ताधारी भाजपला भाजप नगरसेवकानेच घेरल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
वडोळ गावात नगरपालिकेचे ४५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या केंद्राचे संचालन करण्याचे काम ओम इंडस्ट्रीज या ठेकेदाराला जानेवारी २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी देण्यात आले असून त्यासाठी दरमहा सुमारे ८ लाख रुपये मोबदला दिला जातो. या केंद्रामध्ये चार टाक्यांच्या माध्यमातून ब्लोअर, एरिएशन, डिकँडिंग आणि क्लोरिनेशन अशी प्रक्रिया सांडपाण्यावर केली जाते. मात्र सध्या चारपैकी केवळ एकच टाकी सुरू असल्याचा तसेच क्लोरिनेशन प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्याचा आरोप नगरसेवक मनीष म्हात्रे यांनी केला आहे.
थर्ड पार्टी ऑडिट करा
प्रक्रिया केंद्र अपेक्षित पद्धतीने चालत नसताना संबंधित ठेकेदाराला यापूर्वी ३ कोटी रुपये आणि नुकतेच आणखी १ कोटी रुपयांचे बिल कशाच्या आधारावर देण्यात आले, असा सवाल म्हात्रे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
































































