इराणविरुद्धच्या युद्धातून अमेरिकी तेल कंपन्यांनी अफाट पैसा कमावला! रशियन तेल कंपनीच्या प्रमुखांनी केली पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाची सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टचे प्रमुख इगोर सेचिन यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण संकटातून अमेरिकन तेल आणि ऊर्जा कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे, असा दावा त्यांनी केला आहे. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी इराणविरोधात राजकारण करत आहे. तसेच जागतिक ऊर्जा बाजाराला वेठीस धरत आहे.

अमेरिकेने इराणविरोधात केलेल्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर झाले. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आणि ऊर्जा संकटामुळे अमेरिकन कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा झाला. सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचावर बोलताना सेचिन म्हणाले की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणे ही केवळ इराणविरुद्धची कारवाई नव्हती, तर त्याचे संपूर्ण जगावर परिणाम झाले. या युद्धातील सामरिक धोक्यांचे योग्य मूल्यांकन केले गेले नाही, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसला, असेही त्यांनी सांगितले.

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक आहे. जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के पुरवठा या मार्गातून होतो. याव्यतिरिक्त, खते आणि इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील या सागरी मार्गावर अवलंबून आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष वाढल्यानंतर या मार्गावरील वाहुकीसाठी संकट निर्माण झाले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती अनेक वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्या. त्याचा फायदा अमेरिकी कंपन्यांना झाला.

तेलाच्या वाढलेल्या किमती आणि पुरवठ्याच्या संकटामुळे अमेरिकन कंपन्यांना स्पर्धात्मक फायदा मिळाला आणि त्यांना महागड्या ऊर्जा संसाधनांच्या विक्रीतून अतिरिक्त नफा कमावता आला. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणे हा जागतिक ऊर्जा बाजाराचे नियम अमेरिकेच्या बाजूने बदलण्याचा प्रयत्न आहे. याचा उद्देश इराणवर दबाव आणणे हा होता, परंतु त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला, असे ते म्हणाले.