स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात दबावाखाली केली होती खोटी तक्रार; आशुतोष ब्रह्मचारी यांची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणारे आशुतोष ब्रह्मचारी यांनी आता या प्रकरणात मोठी कबुली दिली आहे. ही तक्रार आपण मथुरेतील देवा आश्रमाचे महंत रामचंद्र दास यांच्या दबावाखाली केली होती, असे त्यांनी म्हटले आहे. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये आशुतोष ब्रह्मचारी म्हणाले आहेत की, रामचंद्र दास यांनी आपली दिशाभूल केली आणि स्वामीजींविरुद्ध खोटी तक्रार करण्यासाठी दबाव आणला. या कटात काही अधिकारीदेखील सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आशुतोष ब्रह्मचारी म्हणाले की, “रामचंद्र दास यांनी मला उद्ध्वस्त केले, माझा छळ केला आणि माझ्यावर दबाव आणला. त्यांनी हे करण्यासाठी माझा वापर का केला? माझ्याकडे व्हॉट्सॲप चॅटचे रेकॉर्ड्स आहेत, ज्यामध्ये दास मला स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरोधात खटला कसा दाखल करायचा, हे सांगत आहेत.”

याबाबतचे पुरावे आपण लवकरच सादर करू, असेही त्यांनी म्हटले आहे. रामचंद्र दास हे जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे उत्तराधिकारी असून आशुतोष ब्रह्मचारी हेदेखील पूर्वी रामभद्राचार्य यांचे निकटवर्तीय होते.

रामचंद्र दास यांच्यावर गंभीर आरोप

ब्रह्मचारी यांनी रामचंद्र दास यांना ‘ढोंगी’ आणि ‘फसवणूक करणारा’ संबोधले आहे. त्यांनी मथुरेच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे की, दास यांनी बनावट मृत्युपत्र तयार करून ‘देवा आश्रमा’वर बेकायदेशीर ताबा मिळवला आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, याच वर्षी जानेवारीत आशुतोष ब्रह्मचारी यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद, त्यांचे शिष्य मुकुंदानंद ब्रह्मचारी आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. कुंभमेळा (२०२५) आणि माघ मेळा (२०२६) दरम्यान गुरुसेवाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. याचबद्दल आता त्यांनी आता हा नवीन खुलासा केला आहे.