
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]
आयुर्वेदात मिठाचे अनेक प्रकार वर्णन केले असून प्रत्येक प्रकाराचे वेगळे औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे आयुर्वेदात लवणाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठी नसून उपचारात्मक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे.
आपल्या संस्कृतीत जेवणाचे ताट वाढताना सुरुवात मिठापासून केली जाते. त्याचप्रमाणे आहारविषयक लेखांची सुरुवात मिठापासून केली आहे. आयुर्वेदातील सुश्रुत, चरक, वाग्भट या मूळ ग्रंथांमध्ये विविध प्रकारच्या मिठांचे वर्णन आढळते. त्यांच्या गुणधर्मांची आणि क्रियांची सविस्तर माहिती दिलेली आहे. सैंधव, समुद्र, वीड, सौवर्चल, रोमक, औद्भिद, गुटिका, कटुगट, कृष्ण आणि पांसुज असे अनेक मिठांचे प्रकार वर्णन केलेले आढळतात.
मीठ हा मानवी आहारातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आधुनिक संशोधनानुसार मानवी शरीरात सरासरी 100 ग्रॅम सोडियम असते, जे प्रामुख्याने क्लोराईड आयनांसोबत आढळते. त्यामुळे शरीरातील बहुतेक सोडियम हे सोडियम क्लोराईड (NaCl) म्हणजेच सामान्य मिठाच्या स्वरूपात असते. सरासरी दैनंदिन आहारात 3 ते 6 ग्रॅम सोडियम म्हणजेच सुमारे 10 ग्रॅम मीठ असते.
मानवाने आहारात मीठ वापरण्यास सुरुवात नेमकी केव्हा केली याबद्दल निश्चित माहिती नाही. तथापि, मिठाचा वापर अत्यंत प्राचीन काळापासून होत असून तो शिकारी जीवनशैलीतून शेतीप्रधान जीवनशैलीकडे झालेल्या संक्रमणाच्या काळात सुरू झाला असावा. याचे कारण असे की, प्राणिजन्य अन्नामध्ये सोडियम भरपूर आणि पोटॅशियम कमी असते, तर वनस्पतीजन्य अन्नामध्ये सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त असते. त्यामुळे शेतीकडे वळलेल्या मानवामध्ये जैवरासायनिक गरजेमुळे सोडियमची भूक निर्माण झाली आणि त्याने मिठाचा वापर सुरू केला.
प्रकृती, ऋतूनुसार आणि देशानुसार मीठ खाण्याचे प्रमाण भिन्न आहेत. जसे की, कोरडय़ा थंड हवेत मीठ अधिक मात्रेत सेवन केले जाते, तर कोकण प्रांतात हवेत आर्द्रता अधिक असल्याने मीठ कमी प्रमाणात लागते. अन्न, मासे, प्राण्यांचे मांस टिकवून ठेवण्याकरिता मिठाचा वापर केला जातो तो त्याच्या जंतू प्रतिबंधक गुणधर्मामुळेच, पण म्हणून माणसाने अति प्रमाणात मीठ सेवन करणे योग्य नाही.
आयुर्वेदामध्ये ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे काही मिठाच्या प्रकाराचे गुणधर्म थोडक्यात पाहू.
सैंधव (सैंधव मीठ) चरक, सुश्रुत आणि वाग्भट याचे वर्णन डोळ्यांसाठी हितकारक, हृद्य (मनास व शरीरास आनंददायक), रुचिवर्धक, हलके, स्निग्ध, किंचित गोड, विरेचक, शीतल, त्रिदोषशामक (वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे शमन करणारे), वृष्य (कामोत्तेजक), सर्व मिठांमध्ये श्रेष्ठ, पचनास चालना देणारे, अविकारी/उपद्रवरहित तसेच किंचित मधुर रसयुक्त आहे.
समुद्र लवण – ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे हे लवण पचनानंतर गोड रस देणारे, फार उष्ण नसलेले, त्रास न देणारे, सौम्य रेचक, किंचित स्निग्ध, पोटदुखी (शूल) कमी करणारे, पित्त फार वाढवत नाही.
वीड लवण – हे लवण किंचित क्षारीय, पचनास मदत करणारे, सूक्ष्म मार्गात प्रवेश करणारे, शूल व हृदयरोगात उपयोगी, रुचिवर्धक, तीक्ष्ण, उष्ण, वाताचे नियमन करणारे, पचनशक्ती वाढवणारे, कफ व वाताच्या गतीचे नियमन करणारे, शरीरातील अडथळे दूर करणारे, जडपणा कमी करणारे असे आहे.
सौवर्चल लवण ः हे लवण हलके, उष्णवीर्य, स्वच्छ गुणधर्माचे, पचनानंतर तिक्त रस असलेले , गुल्म (गाठ/टय़ुमर) व शूल कमी करणारे, शरीरातील अडथळे दूर करणारे, हृदयासाठी हितकर, सुगंधी, रुचिवर्धक, सूक्ष्म प्रवेश करणारे आहे.
रोमक लवण – हे लवण तीक्ष्ण, अत्यंत उष्ण, सूक्ष्म प्रवेश करणारे, पचनानंतर कटू रस असलेले, वातशामक, हलके, द्रव करणारे, रेचक,मूत्रल (लघवी वाढवणारे) आहे.
औद्भिद लवण – हे हलके, तीक्ष्ण, उष्ण, द्रव करणारे, सूक्ष्म प्रवेश करणारे, वात नियंत्रित करणारे, किंचित तिखट, किंचित क्षारीय, कफ द्रव करून बाहेर काढणारे असे आहे.
सुश्रुतांच्या मते तिखट (कटू), छेदी गुणधर्माचे –
‘छेदी’ या शब्दाचा अर्थ कापणे, दूर करणे, विभाजन करणे असा असून आयुर्वेदात तो शरीरातील अतिरिक्त मेद किंवा कफ कमी करणाऱया गुणांसाठी वापरला जातो. शरीरातील अवांछित वाढ कमी करणारे, कफाचे विघटन करणारे, पचनानंतर तिखट किंवा उष्ण परिणाम देणारे असे अनेक गुणधर्म आढळतात.
काळे लवण – चरक आणि वाग्भट यांच्या मते काळ्या मिठाला विशेष वास नसतो.त्याचे गुणधर्म सौवर्चल लवणासारखेच असतात.
आयुर्वेदात मिठाचे अनेक प्रकार वर्णन केले असून प्रत्येक प्रकाराचे वेगळे औषधी गुणधर्म आहेत. काही लवणे पचनशक्ती वाढवतात, काही वात-कफ शमन करतात, काही रेचक किंवा मूत्रल असतात, तर काही शरीरातील अडथळे दूर करून आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे आयुर्वेदात लवणाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठी नसून उपचारात्मक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे.

























































