
नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची ऐतिहासिक इमारत ताब्यात घेतल्यानंतर राज्य सरकारने इमारतीच्या नूतनीकरणासाठी 181 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीसोबतच नूतनीकरण आणि विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यांत एअर इंडिया इमारतीला नवी झळाळी मिळणार आहे.
नरिमन पॉइंट येथील 23 मजली एअर इंडियाची इमारत राज्य सरकारने नुकतीच 1 हजार 601 कोटी रुपये मोजून खरेदी केली. इमारतीची खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन इमारत ताब्यात आल्यानंतर सरकारने इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती, नूतनीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवली आहे. त्यासाठी विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळून वित्त विभागाने निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे यांनी दिली.
एअर इंडिया इमारतीसाठी स्थापत्य आणि विद्युतीकरण अशा दोन स्वतंत्र निविदा काढण्यात येतील. इमारत नूतनीकरणाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. स्थापत्य कामात इमारतीची दुरुस्ती, सजावट,नवे फर्निचर, आणि रंगरगोटीचा समावेश आहे. तर विद्युतीकरणात नव्या लिफ्ट, विद्युत उपकरणे बसवणे यांचा समावेश असल्याचे नागरगोजे यांनी सांगितले.
एअर इंडियाचा लोगो इतिहासजमा
एअर इंडियाच्या उत्तुंग इमारतीच्या गच्चीवरील एअर इंडियाचा लोगो संपूर्ण नरिमन पॉइंट परिसरातून सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पण आता महाराष्ट्र सरकारने ही इमारत ताब्यात घेतल्यावर हा लोगो काढण्यात येणार आहे. त्यावर महाराष्ट्र शासनाचे चिन्ह लावण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.
अपेक्षित खर्च
- मजबुतीकरण, दुरुस्ती आणि नूतनीकरण – 75 कोटी 32 लाख 57 हजार रुपये
- संपूर्ण विद्युतीकरण – 70 कोटी 92 लाख 23 हजार रुपये
- वास्तुविशारद, सल्लागार शुल्क, जीएसटी – 34 कोटी 76 लाख 31 हजार रुपये


























































