
महाराष्ट्रातील वारकरी पंथातील पंढरीची निस्सीम भक्त असलेली स्त्रीसंत म्हणजे संत सखुबाई. विठ्ठलाच्या कट्टर भक्त असलेल्या सखुबाईंचे बालपण विठ्ठलभक्तीत गेले. मात्र त्यांच्या सासरकडील लोक मानसिक छळ करीत. आज सखुबाईंचे तीन-चार अभंग शिल्लक आहेत. एका अभंगात त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. विठ्ठलाने सखुसाठी स्त्रीरूप घेतले आणि तिच्या घरात आठ दिवस राबला. असे वर्णन् करणारे हे अभंग आहेत. संत सखुबाईंनी आयुष्यभर विठ्ठलाची सेवा केली. आपल्या अभंगात त्या म्हणतात, ‘सुंदर माझ्या घरात। आत्मा हा नांदत।। चंद्रसूर्य दारात। गोविंद गोविंद।।’ भक्तीच्या, अध्यात्माच्या क्षेत्रात आपले अनुभव व्यक्त करून आपल्यातील वेगळेपण अशा स्त्रीसंतांनी जाणवून दिले आहे. त्यांनी आपल्या अभंगरचनांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत त्यांनी विठ्ठलाचे भाव आपल्या अभंगात वर्णन केले आहेत. जीवनातील अनुभूती त्यांच्या रचनांमधून येतात. दररोजच्या व्यवहारातील प्रसंगांना अनुसरून केलेल्या या ओव्यांची रचना प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. देवळात न जाताही देवाच्या मनात कसे नामस्मरणाने स्थान मिळवायचे, हे स्त्राrसंतांनी दाखवून दिले आहे.


























































