
<< प्रा. विश्वास वसेकर
महाराष्ट्राचे आवडते लेखक व मराठीला मिळालेला हा महत्त्वाचा बालसाहित्यकार, परंतु त्यांच्यावरचा ‘केवळ बालसाहित्यकार’ हा ठसा पुसून टाकणारा ‘जगणं होईल हिरवंगार’ हा कवितासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या कवितांमधील संवेदन स्वभाव तोच आहे. त्यांनी लिहिलेल्या आईवरच्या कविता वेधक अशाच आहेत. आपल्या मोडक्या संसाराचा गाडा एकटीने हाकत आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना जिद्दीने घडवणारी अशी ही आई आहे.
चेहऱ्यावरील उद्याची भ्रांत लपवून
ती उसनं हसू आणायची आपल्या पिल्लांसमोर
खरं तर उरलेलं आयुष्य तिनं
राखून ठेवलं होतं या पिल्लांसाठीच’
नशिबानं आणि दुर्दैवानं कसंही आणि कितीही छळलं तरी आईच्या तत्त्वज्ञानातून ती मुलांना जगण्याची उभारी देते. शिकून स्वतःपुरतं आपल्या मुलांनी जगू नये तर समाजातला अंधार दूर करून गावाला प्रकाशाचं नवं नाव द्यावं अशी तिची अपेक्षा आहे.
तिला ठाऊक आहे,
माझ्या हातातलं पाटीपुस्तकच
माझ्या काळोखात बुडालेल्या गावाला
प्रकाशाचं नवं नाव देईल
आईवर कविता लिहिण्याची परंपरा आहे. यशवंत, माधव ज्युलियनांपासून वामन निंबाळकर, फ.मुं.शिंदे यांनी अशा कविता लिहिल्या आहेत, परंतु प्रत्येकाने एकेकच. एकनाथ आव्हाडांच्या आईवरच्या कवितांची संख्या एकट्या ‘जगणं होईल हिरवंगार’ या संग्रहातच सुमारे दहा आहे. कवीच्या भावविश्वात आईला अनन्यसाधारण स्थान आहे.
‘तुम्ही कसं विचारू शकता’ या कवितेत पाणीटंचाईचे विदीर्ण करणारे चित्र येते. या कवितेत कवीने लावलेला उपरोधाचा स्वर अस्वस्थ करणारा आहे. एरवी शांत आणि सुनसान असलेल्या उन्हात तळपणाऱ्या गावात जेव्हा पाण्याचा टँकर चुकून कधीतरी डोकावतो.
तेवढ्यापुरती येते गावाला जाग
मग होते धावाधाव
गाव जिवंत असल्याची
ही तेवढीच ठळक खूण
एकनाथ आव्हाडांमधला बालसाहित्यकार ‘स्वागतशील’ नावाच्या कवितेत सुंदर असा डोकावला आहे. बालवाडी किंवा प्राथमिक शाळेतल्या बालकांचं हृद्य असं चित्र या कवितेत येतं. त्याचबरोबर शाळेत आणि घरी दहशत निर्माण करणारे घटक हे बालपण कसं होरपळून काढतात याचेही एक कारुण्यपूर्ण चित्र येते.
घर म्हणजे टापटीप, लख्ख नि स्वच्छ झगमग
घर म्हणजे आतुरता, आठवणी, थोडीशी तगमग
कोणत्याही प्रतिभावंताच्या मनात त्याचं घर खोलवर रुतलेलं असतं. मनातून ते जाता जात नाही याची प्रचीती या कवितेतून येते. एकनाथ आव्हाड यांच्या या पुस्तकात विठोबा आणि कृष्ण या देवतांविषयीच्या कविता आहेत. ‘जिवाचा जिव्हाळा’ आणि ‘महिमा’ या दोन कवितांमधून अनुक्रमे विठ्ठल आणि गणेशाचे भक्तिरसाने ओथंबलेले चित्रण येते, तर ‘तूही अस्वस्थ होतोस तेव्हा’ आणि ‘अनुपम भेट’ या कविताही भक्तिभावाने ओथंबल्या आहेत.
एकनाथ आव्हाड हे हाडाचे शिक्षक आहेत. त्यांच्यातला शिक्षक कवितेतून डोकावला नसता तरच नवल. ज्यांनी कवी संमेलनात त्यांची ‘सविता पटेकर….सतत गैरहजर!’ ही कविता ऐकली असेल तर ती कुणी जन्मभर विसरू शकणार नाही. एकनाथ आव्हाडांच्या वर्गात घडलेला हा प्रसंग फार उत्कटतेने कवीने रंगवला आहे.
पोरी, तुझ्यावर मी काय कविता लिहू..
अगं, तूच एक कविता आहेस
जितीजागती वाहत्या नदीच्या प्रवाहासारखी – खळाळणारी
यमक, वृत्त, मात्रांच्या साचात बंदिस्त नसलेली
जगताना भेटणाऱ्या सुखदुःखांची सुंदर क्षणचित्रे यातील अनेक कवितांमध्ये आली आहेत. सुख म्हणजे अनुकूल संवेदना. ऊन, प्रकाश, पूल, पाऊस, झाड या प्रतिमा सुखात्म प्रत्यय देणाऱ्या आहेत. दुःख म्हणजे प्रतिकूल संवेदना. पावसाच्या येण्याने व न येण्याने ओल्या व कोरड्या दुष्काळाची चित्रणे हृदयद्रावक आहेत. कवीमध्ये सुख आणि दुःख या दोहोंकडे पाहण्याची एक सम्यक दृष्टी आहे.
दुःखालाही आपलंसं केलं,
दुःखातच सुख शोधलं की,
दुखावलेली, दुरावलेली,
दुभंगलेली मनं, आयुष्याशी जुळवून घ्यायला
शिकतात हळूहळू
एकनाथ आव्हाडांच्या कवितेवर टागोर आणि साने गुरुजींचे संस्कार आहेत. आपल्या आधीची सगळी महत्त्वाची कविता त्यांनी वाचलेली आणि पचवलेली आहे. त्यांनी त्यांची स्वतची स्वतंत्र शैली कमावलेली आहे याचे प्रत्यंतर या संग्रहातील प्रत्येक कवितेतून येते.
‘जगणं होईल हिरवंगार’
कवी ः एकनाथ आव्हाड
मुखपृष्ठ ः चंद्रमोहन कुलकर्णी
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे ः 100, मूल्य ः 160 रुपये


























































