
महावितरण कंपनीतील ‘उपकेंद्र सहाय्यक’ पदाच्या भरती प्रक्रियेंतर्गत प्रतीक्षा यादीतील 757 उमेदवार नियुक्तीपासून वंचित आहेत. सात वर्षांनंतरही त्यांची नियुक्ती केलेली नाही. प्रशासनात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असूनही राज्य सरकार, ऊर्जा विभाग आणि महावितरणकडून नियुक्ती देण्याबाबत टोलवाटोलवी सुरू आहे, अशी नाराजी व्यक्त करीत उमेदवारांनी रिक्त पदांवर तातडीने नियुक्ती देण्याची मागणी केली.
2019 मध्ये महावितरणच्या उपकेंद्र सहाय्यक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या पदाच्या प्रतीक्षा यादीतील 757 उमेदवारांना सात वर्षांनंतरही नियुक्ती देण्यात आलेली नाही. महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे उपलब्ध असल्याने प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना रिक्त पदांवर तातडीने नियुक्ती देणे आवश्यक आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. भोंगळ कारभाराचा उमेदवारांना फटका बसत असल्याचे उमेदवार उमेश डुणे यांनी दिली.

























































