
घाटकोपरमधील एका सोसायटीत विशिष्ट धर्मासाठी परिसरात पांढरे पट्टे मारल्याने निर्माण झालेला वाद अजून संपला नसताना दादरच्या डीएस बाबरेकर रोडवरदेखील पांढऱ्या पट्ट्या मारल्याने संताप निर्माण झाला आहे. हा प्रकार समोर येताच पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी मनसेचे संदीप देशपांडे हेदेखील उपस्थित होते. यावेळी पांढऱ्या पट्ट्या हटवण्यासाठी 3 तासांचा वेळ देण्यात आला. यानंतर पालिकेने तातडीने हे पांढरे पट्टे पुसून टाकले.
एका धर्माचे धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी या पांढऱ्या पट्ट्या मारल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. याची दखल घेत आज पालिकेतील विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पालिकेला इशारा देत तातडीने पांढरे पट्टे हलवण्यासाठी अल्टीमेटम दिला. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की शिवसेनेने 93च्या दंगलीत मुंबईतील सर्वधर्मीयांचे रक्षण केले. असे असताना आता काही ठरावीक धर्माचे लोक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी असे उपद्व्याप करीत आहेत. मात्र शिवसेना असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

























































