देवदर्शनावरून परतताना पंढरपुरातील भाविकांवर काळाचा घाला, पिकअप व्हॅन विहिरीत कोसळून आठ ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूरमधील रांजणी गावचे भाविक म्हसवड येथील श्री सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परत गावी येत असताना म्हसवड-पंढरपूर मार्गावर माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे चालकाचा ताबा सुटून पिकअप रस्त्याकडेच्या विहिरीत कोसळून आठ भाविक ठार झाले. तर सात भाविकांना तांदूळवाडीकरांनी वाचविले. आज दुपारी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात राहणारे सातोरे आणि बावचे कुटुंबीय म्हसवड येथील श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना म्हसवड-पंढरपूर महामार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत भाविकांची गाडी कोसळली. या वाहनात लहान मुले, महिला, पुरुष असे 15 जण होते. पिकअप वाहन विहिरीत कोसळताच पाच महिला आणि तीन लहान मुलांचा गुदमरून मृत्यू झाला.

गावकऱयांनी पाण्यात उडय़ा मारल्या

पिकअप गाडी पाण्यात पडल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. कसलाही विचार न करता त्यांनी धडाधड पाण्यात उडय़ा मारल्या आणि अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावली. या अपघातातील भाविकांच्या मदतीसाठी पोलीस पथक, अग्निशमन दल, महसूल प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले.जेसीबी, ट्रक्टरच्या साहाय्याने पिकअप गाडी बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. दरम्यान, मृतांच्या वारसांना राज्य शासनाने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.