
जीवघेणे रोग देणारी रसायने बनवणाऱ्या कंपन्या आणि अणुऊर्जा प्रकल्प आणून कोकणचा निसर्ग आणि पर्यावरण उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य शासनाने मांडला आहे. या विनाशकारी प्रकल्पांविरोधात कोकणवासीय एकवटले आहेत. कोकण वाचवण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यासाठी कोकणातील वाड्यावस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मुंबईकर कोकणवासीयांच्या मेळाव्यात यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आले.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील सुरेंद्र गावसकर सभागृहात जनता दल सेक्युलर, कोकण जनविकास समिती आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकणची कैफियत’ हा परिसंवाद नुकताच पार पडला. रत्नागिरी जिह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत पीफास हे जीवघेणे रसायन बनवले जाते. ज्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात आले आहे. ही कंपनी बंद करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील बारसू आणि पूर्णगड तसेच सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यास राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पांमुळे कोकणचा समुद्र प्रदूषित होणार असून समुद्री जीव तसेच निसर्गसंपत्तीची हानी होणार आहे.
या परिवसंवादात डॉ. मंगेश सावंत, अशोक रानडे, अशोक जाधव, प्रकाश लव्हेकर, प्रभाकर नारकर या तज्ञ आणि विचारवंतांनी कोकणवासीयांना या विनाशकारी प्रकल्पांच्या दुष्परिणामांबद्दल सावध करतानाच कोकणचा नरक बनवणाऱया या प्रकल्पांविरुद्ध उठाव करण्यासाठी एक व्हा अशी साद घातली. मेळाव्याचे सूत्रसंचालन संजय परब यांनी केले. मेळाव्याला मुंबईकर कोकणवासीयांबरोबरच कोकणातील विविध समाज आणि संघटनांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात मंजूर झालेले ठराव
लक्ष्मी ऑर्गेनिकवर कठोर कारवाई – पीफास हे घातक रसायन बनवण्यास लक्ष्मी ऑर्गेनिकला कुणी परवानगी दिली त्याची चौकशी करावी. पीफासचे उत्पादन होत असलेला लोटे परशुराम परिसर आणि कंपनीतील घातक कचऱयाची विल्हेवाट लावण्यात येत असलेल्या तळोजा परिसरातील नागरिक आणि कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. तसेच या परिसरातील जलस्रोते आणि भूगर्भजलाची चाचणी करण्यात यावी.
कोकणात बाजारपेठ उभारणे – दूध, अंडी आदी पदार्थ कोकणातील लोकांना विकत घ्यावे लागतात. समृद्ध कोकणात दुधाचे उत्पादन करण्यासाठी डेअरी उद्योग आणि पोल्ट्री उद्योग उभारले पाहिजेत. जेणेकरून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होऊ शकेल.
अणुऊर्जा नको, सौरऊर्जा हवी – कोकणात अणुऊर्जा प्रकल्प आणून विध्वंस करू नका. त्यापेक्षा सर्वांना परवडणाऱया सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आणावेत.
कोकणामध्ये मुंबई-गोवा महामार्ग, सागरी महामार्ग पुरेसे आहेत. त्यांचे काम वेगाने पूर्ण करा. ग्रीन कॉरिडोर आणि शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही.




























































