
आयकर भरत नसलेल्याचा उत्पन्नाचा दावा मान्य करून अपघाताची नुकसानभरपाई देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
एका डॉक्टराचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी भरपाईसाठी अपघात दावा न्यायाधिकरणाकडे अर्ज केला. डॉक्टरचे उत्पन्न दरमहा दहा हजार रुपये ग्राह्य धरून न्यायाधिकरणाने सुमारे साडेसहा लाख रुपये भरपाई मंजूर केली. त्याविरोधात कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.
न्या. जितेंद्र जैन यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. डॉक्टर अनुभवी होते. त्यामुळे भरपाईची रक्कम ठरवताना त्यांचे उत्पन्न दरमहा 50 हजार रुपये ग्राह्य धरून 50 लाख रुपये भरपाई मंजूर करावी, असा युक्तिवाद कुटुंबीयांनी केला.
मात्र अपघातात मृत्यू झालेले डॉक्टर आयकर भरत नव्हते. त्यांची इन्कम टॅक्स रिटर्न फाईल नव्हती. अशा परिस्थितीत या डॉक्टरांचे दरमहा उत्पन्न 50 हजार रुपये होते हे मान्यच करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या डॉक्टरांचे उत्पन्न दहा हजार ऐवजी पंधरा हजार रुपये दरमहा असेल असा विचार करून भरपाईच्या रकमेत वाढ केली जात आहे. ही रक्कम साडेसहा लाखांवरून सुमारे अकरा लाख केली जात आहे. ही रक्कम आठ आठवडय़ात पीडिताच्या कुटुंबाला द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.
दुबईतील उत्पन्न नाकारले
अपघातापूर्वी डॉक्टर दुबईत होते. भरपाईची रक्कम ठरवाताना त्यांच्या तेथील उत्पन्नाचा विचार केला जावा, अशी विनंती कुटुंबीयांनी केली होती. हा अपघात 2002 मध्ये झाला. संबंधित डॉक्टर 1999 च्या आधी दुबईत होते. तेव्हाचे उत्पन्न भरपाईसाठी ग्राह्य धरताच येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

























































