आमदार रोहित पवारांची प्रकृती खालावली, आंदोलनाचा तिसरा दिवस; सलाईन लावण्यास नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनाअट दोन लाखांपर्यंत सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता. आजही सरकारकडून मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही. ‘अन्नत्याग’ केल्याने आमदार पवार यांची प्रकृती बिघडली आहे. तरीदेखील ते आंदोलनावर ठाम आहेत. उद्यापासून (दि. 15) श्री विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरी येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार पवार यांचा बीपी आणि शुगर कमी झाली आहे. त्यांना अशक्तपणा आला असल्याने डॉक्टरांनी सलाईन लावून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, सरकारकडून मंत्री गिरीश महाजन हे मध्यस्थी करण्यासाठी आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. ते आल्यानंतरच सलाईन घेऊ, असे आमदार पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला. सरकारने कोणत्याही अटी-शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच शेकापचे नेते भाई जयंत पाटील, खासदार बजरंग सोनवणे, खासदार नीलेश लंके, आमदार सुनील भुसारा, भावना घाणेकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला.

पत्नी, मुलांसह कुटुंब झाले भावूक

शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कजर्माफीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे 12 जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला तीन दिवस झाले असून, त्यांची तब्येत बिघडू लागली आहे. आंदोलनस्थळी पहिल्या दिवसापासूनच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे ठाण मांडून आहेत. तर आज त्यांचे संपूर्ण कुटुंब आंदोलनात दाखल झाले आहे. वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, पत्नी कुंती पवार, मुलगा शिवांश आणि आनंदिता यांनी रोहित पवार यांना पाहून भावूक झाले. पप्पांचा सुकलेला चेहरा पाहून आमदार पवार यांच्या मुलांच्या डोळ्यांत अश्रू आले. मुलांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून रोहित पवार भावूक झाले. मुलांचा हात हातात घेत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांचे डोळे पाणावले.

संपूर्ण कर्जमाफी करा – जरांगे-पाटील

शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. खरेतर सरकारने या आंदोलनाची वेळच येऊ द्यायला नको होती. मात्र, सरकार शेतकरी म्हटले की द्यायला तयार होत नाही. नियम, अटी लादून बेजार करत आहे. माझे सरकारला सांगणे आहे की, एकदाचीच संपूर्ण कर्जमाफी करा, कटकट ठेवू नका, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडे केली आहे.