उद्योजकांचा न्याय शेतकऱ्यांना लावून संपूर्ण कर्जमाफी करा, राजू शेट्टींची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योजकांची कर्जमाफी करताना सरकारने जो न्याय लावला, तोच न्याय शेतकऱ्यांना लावून विनाअट सरसकट कर्जमाफी करावी. महाराष्ट्राच्या काहीही फायद्याची नसलेली बुलेट ट्रेन असो किंवा शक्तिपीठ महामार्गासारखे प्रकल्प रद्द करावेत; पण सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. राजू शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मते घेताना मुख्यमंत्री फडणवीस हे 7/12 कोरा… कोरा… कोरा… असे तीनवेळा म्हणाले होते. सातबारा कोरा करणे तर सोडाच; पण आता विना निकष दोन लाखदेखील शेतकऱ्यांना देत नाहीत. आज शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे तो अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतेही निकष न लावता संपूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज बनली आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

सरकारने एका झटक्यात उद्योगपतींची 16 लाख कोटींची कर्जमाफी केली. त्यावेळी कोणते नियम लावले होते. तेच नियम शेतकरी कर्जमाफीसाठी का नियम लावले जात नाहीत? असा सवालही शेट्टी यांनी केला आहे.

सगळे लुटारू गुजरातचे

सरकारने बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, शेतकऱ्यांचा विरोध असलेला शक्तिपीठ महामार्गाचे नेमलेले ठेकेदार हे गुजरातचे आहेत. त्यामुळे सगळे लुटारू हे गुजरातचे, त्यांना पोसण्याचे काम सरकार करत आहे. अगोदर पाणी पळवले. आता उद्योग पळवत आहेत. मात्र, येथील शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे काम करावे लागत आहे, अशी खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.