
कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 30 वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केली आहे. नालासोपारा येथील राहत्या घरात गळफास घेत संचिताने जीवन संपवलं. रविवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. संचिताच्या मृत्यूने कलाविश्वात खळबळ उडाली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आचोळे गावातील साई संतोषी इमारतीत राहणाऱ्या संचिता उगले हिने शनिवारी (१४ जून) सायंकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. यावेळी तिने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. संचिता नालासोपारा येथे तिचे आईवडील आणि बहिणीसोबत राहत होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती घरात एकटी होती. साडीने गळफास घेत अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून संचिताने आत्महत्या का केली, याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी व स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने वसई-विरार महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच आचोळे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. आचोळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद वाघ यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास केला जात असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, मृत महिलेचे वडील मच्छिंद्र उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आचोळे पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे. पोलिसांनी सांगितले की, तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही.
संचिता ही हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा होती. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमातही संचिता दिसली होती. या सिनेमात तिने महाराणी ताराबाईंची भूमिका साकारली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या मालिकेतही ती दिसली होती.



























































