
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ हंगामात राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १७२४ कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली. या घरट्यांमधील तब्बल १,०८,५९६ कासवांच्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलेले असून, एकूण उबवण यशाने प्रमाण ६१.२० टक्के नोंदविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ९६४ घरटी नोंदविण्यात आली असून त्यामधून ५४,२२७ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७३८ घरट्यांमधून ५३,३२५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आणि ६९.९५ टक्के इतके राज्यातील सर्वाधिक उबवण यशाचे प्रमाण नोंदविण्यात आले. रायगड जिल्ह्यात २२ घरट्यांमधून १,०४४ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातील आरावी, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकामळे, पूर्णगड़, सालदुरे/पानंदे आणि कचरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोळी आणि कोंडुरा या समुद्रकिनाऱ्यांवर प्रथमच कासवांचे घरटी नोंदविण्यात आली. यावरून महाराष्ट्राची किनारपट्टी ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांच्या प्रजननासाठी अजूनही महत्त्वपूर्ण अधिवास असल्याचे अधोरेखित होत आहे.
२०१८ पासून कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व महराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या सहाय्याने मच्छिमारांकारिता नुकसान भरपाई योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यामध्ये मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासव व इतर संरक्षित समुद्री प्राण्यांना जाळे कापून जीवनदान देण्याकरिता मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ४८६ समुद्री कासवांना वाचवण्यात मच्छिमार व वन विभाग यांना यश प्राप्त झाले आहे. त्याकरिता मच्छिमारांना एकूण सुमारे रु. ६१,२१,८५०/- एवढी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे समुद्री कासवे त्यांना झालेल्या इजांमुळे किंवा संक्रमणांमुळे समुद्राकिनाऱ्यांवर जखमी अवस्थेत आढळतात. अशा कासवांची संख्या पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. जिवंत कासव वाहून किनान्यावर आल्यास त्याला त्वरित उपचार मिळण्याकरिता कांदळवन कक्षामार्फत मरीन रिस्पॉडंट गटाची स्थापना केलेली असून त्यात महाराष्ट्र वन विभागातील कर्मचारी (वन परिक्षेत्र अधिकारी), कांदळवन प्रतिष्ठानाचे कर्मचारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा समावेश आहे. २०११ पासून वाईल्डलाईफ कंझर्वेशन व ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि महाराष्ट्र वन विभाग (डहाणू विभाग) समुद्री कासवांसाठी उपचार व संक्रमण केंद्र डहाणू येथे चालवत आहे. तसेच कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग व कांदळवन प्रतिष्ठान यांच्यावतीने मुंबई व जवळपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर वाहून येणाऱ्या ‘जखमी कासवांच्या उपचाराकरिता ऐरोली येथे कासव उपचार केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. सोबत अशी तात्पुरती उपचार केंद्रे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत देखील सुरु करण्यात आली आहेत.
ऑलिव्ह रिडले समुद्र कासव हे वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत संरक्षित प्राणी असून सागरी परिसंस्थेच्या संतुलनात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. राज्यातील ऑलिव रिडले कासव संवर्धन कार्यक्रम हा स्थानिक लोकसहभागावर आधारित यशस्वी उपक्रम असून किनारी भागातील कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि कांदळवन कक्ष, वन विभाग यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.





























































