
मृग नक्षत्र सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी यवतमाळ जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. सुरुवातीच्या हलक्या सरींनंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी चिंतेत सापडला आहे. मशागतीची बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी दमदार पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. उष्णतेची तीव्रता कायम असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात पावसासाठी पारंपरिक लोकपरंपरांना उजाळा मिळताना दिसत आहे.
पावसाच्या देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक गावांमध्ये “धोंडी धोंडी पाणी दे…” हा पारंपरिक उपक्रम सुरू झाला आहे. कमरेला कडुलिंबाच्या फांद्या बांधून लहान मुले आणि शेतकरी गावोगावी फिरत वरुणराजाला साकडे घालत आहेत. काही ठिकाणी डोक्यावर पाण्याचा घडा घेऊन पारंपरिक पद्धतीने नृत्य केले जात असून डफलीच्या तालावर “धोंडी धोंडी पाणी दे, रान हिरवेगार होऊ दे…” अशा ओव्या आणि गीते गात नागरिक दारोदार फिरताना दिसत आहेत.
पावसासाठी केले जाणारे हे लोकपरंपरेतील विधी आजही ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग मानले जातात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आणि गावकरी वरुणराजाकडे आशेने पाहत आहेत.
दरम्यान, येत्या काही दिवसांत मान्सून सक्रिय होऊन दमदार पाऊस पडावा, अशी प्रार्थना शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. पाऊस लांबल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





























































