
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्जमाफीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शेतकर्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना शिवसेना पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीत सातबारा कोरा करू असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजना ही शेतकर्यांना दिलासा देणारी नसून कर्जवसुली योजना असल्याचा आरोप करण्यात आला. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या अटी अत्यंत जाचक असून त्यामुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
सन २००८, २०१७ आणि २०१९ मधील कर्जमाफी योजनांमधून अनेक पात्र शेतकरी वंचित राहिले असल्याचे सांगत, काहींना वारंवार लाभ मिळाला तर अनेकांना एकदाही कर्जमाफी मिळाली नाही, ही शासनाची अपयशी धोरणे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नियमित कर्जफेड करणारे व थकीत शेतकरी अशा दोन्ही घटकांवर अन्यायकारक अटी लादल्या गेल्यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कांदा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नांवरही आंदोलकांनी सरकारला धारेवर धरले. नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नावाखाली व्यापार्यांकडून शेतकर्यांची आर्थिक लूट होत असल्याचे सांगण्यात आले. कापसावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे बाजारभाव घसरून शेतकर्यांचे नुकसान होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
नांदेड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शासनाकडे अटी-शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा, कांदा-कापूस-सोयाबीनसाठी हमीभाव, पीककर्ज व कर्ज नूतनीकरणाची सुविधा, खतांचा पुरेसा पुरवठा, शेतीपंपांना सलग १२ तास वीजपुरवठा, ३३ हजार कोटींच्या मदत पॅकेजची अंमलबजावणी आणि विमा भरपाईची तात्काळ अदा यांसह विविध मागण्या करण्यात आल्या. या सर्व मागण्या तातडीने मान्य न झाल्यास शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिला.
जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हा संघटक नरहरी वाघ, महानगर प्रमुख मनोज यादव, तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, पक्षाचे प्रवक्ते डॉ. बालाजी पेनुरकर, तालुकाप्रमुख पद्माकर पाटील सावंत, नंदू पाटील वैद्य, विधानसभाप्रमुख विजय कल्याणकर, शहरप्रमुख जितुसिंग टाक, तालुका संघटक नवनाथ पाटील जोगदंड, उपतालुकाप्रमुख पुरभाजी जाधव पासदगावकर, युवासेना पदाधिकारी डॉ. सौरभ देवकत्ते, मारोतराव कदम, विठ्ठलराव कदम, ब्रिजलाल उगवे, गजानन देशमुख, प्रवीण देशमुख, व्यंकटी बाराटे, माधव पांचाळ, बाबासाहेब जोगदंड, बालाजी कल्याणकर, सुरेश पावडे, किशोर ठाकूर, भाया शर्मा, लालचंद यादव यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.




























































