Beed News – जाचक अटी व शर्ती रद्द करा…, फसव्या कर्जमाफी विरोधात शिरूरमध्ये शेतकर्‍यांचा जनआक्रोश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार अंबादास दानवे यांच्या आदेशावरून, जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने शिरूर तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

या रॅलीस मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम म्हणाले की, निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांना सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर सदरील आश्वासनास हरताळ फासून जाचक अटी व शर्ती लावून शेतकर्‍यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले आहे. महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकर्‍यांची शुद्ध फसवणूक आहे. ही कर्जमाफी नव्हे तर शेतकर्‍यांकडून कर्ज वसुली आहे. 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांना केवळ पन्नास हजार रुपयांची मदत मिळणार आहे. ही मदत पण शेतकर्‍यांकडे असलेली पूर्वीची थकबाकी भरली तरच मिळणार आहे.

राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांची थकबाकी ही लाख दीड लाख रुपये असून त्यांना कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर पन्नास हजार रुपयासाठी एक लाख रुपये भरावे लागतील अशा रझाकारी अटी व शर्ती लावण्यात आल्या आहेत. असा सरकारचा आदेश म्हणजे बुडणार्‍या शेतकर्‍यांच्या गळ्यात दगड बांधण्याचा प्रकार आहे. वास्तवात शेतकर्‍यांना न्याय देण्याची गरज आहे. त्यामुळे कर्जमाफीतील अन्यायकारक अटी व शर्ती रद्द कराव्यात व शेतकर्‍यांना विनाअट शर्ती सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.

या प्रसंगी बोलताना माजी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनीही आपल्या भाषणात सरकारवर घणाघाती टीका केली. सदरील आंदोलनाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक भाई संजय महाद्वार यांनी केले तसेच तालुका प्रमुख सोपान मोरे, किसान सेना तालुका प्रमुख हरी खेडकर, महिला संघटिका मीरा नवले, ठकसेन तुपे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख आदीनाथ खेडकर, उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, दीपक मोराळ, शिवाजी कुलकर्णी, तालुकाप्रमुख सुभाष राऊत, मुकुंद शिंदे, अजय दाभाडे, अशोक जाधव, भोजराज पालीवाल, श्रीधर गरड, विधानसभा प्रमुख सुशील पिंगळे, प्रवीण घाटे, सुमित घाडगे, शेख सिराज, शेख कलीम, बंडू तळेकर, नवनाथ प्रभाळे, रवी वाघमारे, गणेश लोणकर, सतिशसिंह परदेशी, रवी भोसकर, रंगनाथ पैठणकर, आसाराम बारगजे, केशव बारगजे, चव्हाण टेलर, राजेश कोकणे, संजय सानप इत्यादी शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूरच्या बसस्थानकापासून सुरू झालेली रॅली तहसील कार्यालयावर धडकली
शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या महायुतीचा धिक्कार असो, सात बारा कोरा झालाच पाहिजे, भीक नको हक्क हवा, जाचक अटी व शर्ती रद्द करा, विना अट सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे इत्यादी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. रॅलीत शिवसैनिक, शेतकर्‍यांची उपस्थिती लक्षणीय होती.

शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेनेची ‘बळीराजा गर्जना,ट्रॅक्टर रॅली’; विभागीय आयुक्तालयावर धडकली