‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली 15 लाखांची फसवणूक, पाकिस्तानशी लिंक असलेल्या रॅकेटचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरोधात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानस्थित एका सूत्रधाराशी संबंध असलेल्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या आरोपींकडून फसवणुकीतून मिळालेला पैसा बनावट बँक खात्यांमार्फत फिरवून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात पाठवला जात असल्याचा तपासात उलगडा झाला आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये उत्तर प्रदेशातील कन्नौजचा अंकित (23), कानपूरचा सैफ अन्सारी (24) आणि दिल्लीतील मोहम्मद नूर आलम (24) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून फसवणुकीशी संबंधित 1.03 लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे.

या प्रकरणाची सुरुवात 19 जानेवारी रोजी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारीतून झाली. तक्रारदाराला 8 जानेवारी रोजी एका महिलेचा फोन आला होता. तिने स्वतःला दूरसंचार कंपनीची कर्मचारी असल्याचे सांगत, तक्रारदाराच्या आधार कार्डवर नोंद असलेला मोबाईल क्रमांक बंगळुरूमध्ये बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंगसाठी वापरला जात असल्याचा दावा केला.

यानंतर तक्रारदाराला व्हिडिओ कॉलवर एका व्यक्तीशी जोडण्यात आले. त्या व्यक्तीने स्वतःला बंगळुरूतील इंदिरानगर पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक असल्याचे सांगितले. तक्रारदाराच्या नावाने उघडण्यात आलेली अनेक बँक खाती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करत त्याला चौकशी सुरू असल्याची भीती दाखवण्यात आली.

सायबर भामट्यांनी तक्रारदारावर सतत लक्ष ठेवत त्याच्याकडून बँक खाती, मुदत ठेवी, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीची माहिती मिळवली. त्यानंतर आरबीआयच्या ऑडिटसाठी पैशांची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सांगून त्याला गुंतवणूक मोडून विविध खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम परत केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले.

या भूलथापांना बळी पडत तक्रारदाराने 9 ते 16 जानेवारीदरम्यान विविध बँक खाती आणि यूपीआय आयडींवर तब्बल 15.31 लाख रुपये पाठवले. मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

तपासादरम्यान पोलिसांनी फसवणुकीतील काही रक्कम जमा झालेली दोन बँक खाती शोधून काढली. तांत्रिक तपासात या खात्यांशी संबंधित मोबाईल क्रमांक एकाच डिव्हाइसवर वापरले जात असल्याचे आणि त्यांचे लोकेशन फरीदाबादमध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि फरीदाबाद येथे छापे टाकून तिन्ही आरोपींना अटक केली.

चौकशीत मोहम्मद नूर आलम हा सायबर गुन्हेगारांना ‘म्युल अकाउंट्स’ म्हणजेच बनावट व्यवहारांसाठी वापरली जाणारी बँक खाती उपलब्ध करून देत असल्याचे उघड झाले. तसेच तो पाकिस्तानस्थित ‘बिलाल’ नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याची माहितीही समोर आली आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, फसवणुकीतून मिळालेला पैसा विविध खात्यांमधून फिरवून त्याचे यूएसडीटी (USDT) क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर केले जात होते. त्यानंतर ही रक्कम परदेशातील सूत्रधाराकडे पाठवली जात होती. या व्यवहारांच्या बदल्यात आरोपींना क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात कमिशन मिळत होते, जे नंतर विविध बँक खात्यांमधून काढले जात होते.