
राज्य परिवहन मंडळाच्या विविध सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर १ ऑगस्ट पासून एन सी एम सी कार्ड बंधनकारक करण्याची घोषणा राज्य परिवहन मंडळ आणि परिवहन मंत्र्यांनी केली खरी मात्र देवरुख बसस्थानकात कोणतीही पूर्व सूचना न देता संबंधित ठेकेदाराने कार्डची नोंदणी बंद केल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आज देवरुख बसस्थानकातून रिकाम्या हाताने परतावे लागले आणि आर्थिक भुर्दंडासह नाहक मनस्ताप सहन करावा लागला. रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी अशी मागणी लोवले संगमेश्वर येथील ज्येष्ठ नागरीक कमलाकर लोवलेकर यांनी केली आहे.
गत आठवड्यात परिवहन मंत्र्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासातील विविध सवलतींचा लाभ घ्यायचा असल्यास प्रवाशांकडे एन सी एम सी कार्ड असणं बंधनकारक केलं. यासाठी १ ऑगस्ट ही तारीख देखील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून जाहिर करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात एन सी एम सी कार्ड काढण्याची सोय देवरुख बसस्थानकात असून हे कार्ड तयार करुन देण्याचे कंत्राट खासगी कंपनीकडे आहे.
देवरुख येथे ज्या ठेकेदाराकडे हे काम सोपवण्यात आले आहे, त्याने अचानक आजपासून कोणतीही पूर्व सूचना न देता काम बंद केले. लोवले संगमेश्वर येथील कमलाकर लोवलेकर (८०) हे आज सकाळी ८ वा. खास रिक्षा करुन देवरुख बसस्थानकात एन सी एम सी कार्ड काढण्यासाठी पोहचले. देवरुख बसस्थानकात ८:३० वा. पोहचल्यानंतर त्यांना सदर ऑफिस ९:१५ उघडेल असे आरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. सकाळचे दहा वाजले तरी एन सी एम सी कार्डचे कार्यालय न उघडल्यामुळे लोवलेकर यांनी परत आरक्षण कक्षात चौकशी केली, यावेळी त्यांना सदर कार्ड काढण्याचा ठेका एका खासगी कंपनीकडे असल्याचे सांगून तेथे काम करणाऱ्या एका कामगार महिलेचा मोबाईल नंबर दिला. सकाळी १०:३० पर्यंत अनेक ज्येष्ठ नागरीक आणि महिला कार्ड काढण्यासाठी आणि काही पूर्वी काढलेली कार्ड नेण्यासाठी दोन तास बसस्थानकात तातकळत उभे होते.
अखेरीस सर्वांनाच होत असलेला मनस्ताप लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक कमलाकर लोवलेकर यांनी एन सी एम सी कार्ड काढून देणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला फोन लावला. यावेळी तीने तांत्रिक अडचणीमुळे कार्यालय बंद असल्याचे १०:३० वा. सांगितले. याबाबत आपण कार्यालयात उपस्थित राहून उपस्थित ज्येष्ठ नागरीक आणि महिलांना सांगणं आवश्यक असल्याचे सांगताच त्या कर्मचारी महिलेने उत्तर देणं टाळलं.
ज्येष्ठ नागरीक कमलाकर लोवलेकर या बेजबाबदार कारभाराबाबत देवरुख आगारप्रमुखांना ज्येष्ठ नागरिकांच्या आणि महिलांची व्यथा सांगण्यासाठी गेले असता आगारप्रमुख भेटू शकल्या नाहीत. अखेरीस लोवलेकर यांनी आगारातील अन्य अधिकारी कोळी यांची भेट घेतली. त्यावेळी कोळी यांनी लोवलेकर यांचे म्हणणे ऐकून घेतलं आणि कार्ड काढणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीना फोन केला असता, आम्हाला मिळणारे कमिशन तुटपुंजे असल्यामुळे आम्ही आजपासून कार्ड काढण्याचे काम बंद केल्याचे सांगितले. याबाबत कोळी यांनी आपण तसे महामंडळाला कळवलं आहे का ? कार्ड काढण्याच्या ठिकाणी फलक लावला आहे का ? असे प्रश्न विचारले असता उत्तर देण्याचे टाळले.
एकीकडे परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन मंडळ प्रवाशांना सवलत हवी असल्यास एक ऑगस्ट पासून एन सी एम सी कार्ड बंधनकारक असल्याचे सांगत आहे मात्र दुसरीकडे कार्ड काढण्याची व्यवस्था देवरुख सारख्या मोठया बसस्थानकात कोलमडून गेली असल्याचे चित्र आहे. कार्ड काढताना मिळणारं कमिशन तुटपुंजे आहे, हे ठेकेदाराला आजच कळले कां? देवरुख बसस्थानकात आज सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ११:३० पर्यंत एन सी एम सी कार्ड काढण्यासाठी थांबून राहिलेल्या असंख्य ज्येष्ठ नागरीक आणि महिलांना झालेल्या मनस्तापाला आणि आर्थिक भुर्दंडाला जबाबदार कोण ? असा प्रश्न कमलाकर लोवलेकर यांनी उपस्थित केला आहे. याबाबत विभाग नियंत्रकांनी या बेजबाबदारपणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरीक कमलाकर लोवलेकर यांनी केली आहे.
संगमेश्वर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. देवरुख बसस्थानकात एन सी एम सी कार्ड काढण्यासाठी जाणे वयोवृद्ध आणि महिलांना त्रासदायक होत आहे. याची संबंधितांनी गंभीर दखल घेऊन संगमेश्वर बसस्थानकात विनाविलंब एन सी एम सी कार्ड काढण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी. आज देवरुख बसस्थानकात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जो मनस्ताप सहन करावा लागला त्याबाबत आपण परिवहन मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.
कमलाकर लोवलेकर ( ज्येष्ठ नागरीक, लोवले – संगमेश्वर )





























































