Jammu Kashmir – राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगाचा स्फोट, जेसीओसह 4 जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू आणि कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी भूसुरुंगाचा स्फोट झाला. या स्फोटात नियमित गस्तीवर असलेल्या एका जेसीओसह चार जवान जखमी झाले.राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात ही घटना घडल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कराची एख तुकडी सीमेवर नियमित गस्त घालत असताना हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच, सीमेवर तैनात असलेले इतर सुरक्षा कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. या अपघातात जखमी झालेल्या जेसीओ आणि तीन जवानांना तात्काळ प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीमेपलीकडून होणारी दहशतवादी घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून संवेदनशील भागात भूसुरुंग पेरले जातात. कधीकधी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हे भूसुरुंग त्यांच्या मूळ जागेवरून वाहून जातात. अशाच एका भूसुरुंगावर जवानाचा चुकून पाय पडल्याने हा स्फोट झाला, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरातील शोधमोहीम तीव्र केली आहे.