‘फ्युचर वायफी’ म्हणत लग्नाचे आमिष; तरुणीशी संबंध ठेवल्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन नाकारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला दिल्लीतील न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. आरोपीने पीडितेला ‘फ्युचर वायफी’ आणि ‘वायफी’ असे संबोधून तिची संमती मिळवली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्गुरवरिंदर सिंग जग्गी यांनी सतीश कुमार या आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. केरळमधील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून दिल्लीत बोलावणे आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे, असा आरोप त्याच्यावर आहे.

9 जून रोजी दिलेल्या आदेशात न्यायालयाने म्हटले की, आरोपांचे गांभीर्य, आरोपीचे तपासापासून दूर राहण्याचे वर्तन आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यासाठी तसेच वैद्यकीय तपासणीसाठी त्याची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याने त्याला अटकपूर्व जामीन देणे सुरू असलेल्या तपासासाठी अडथळा ठरू शकते.

सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, केरळमधील 23 वर्षीय सायबर सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणीची आरोपीशी एका विवाह संकेतस्थळावर ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिला दिल्लीत येण्यासाठी प्रवृत्त केले. दोघेही छतरपूर येथील एका एअरबीएनबी निवासस्थानी सुमारे 19 दिवस एकत्र राहत होते.

तक्रारीनुसार, आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्यानंतर अचानक तिच्याशी संपर्क तोडला, तिला ब्लॉक केले आणि गायब झाला.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 (फसव्या मार्गाने शारीरिक संबंध प्रस्थापित करणे) आणि कलम 351 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटकपूर्व जामीनाला विरोध करताना सरकारी वकिलांनी सांगितले की, दोघांमधील संवादाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि डिजिटल ट्रेल तपासण्यासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे.

दुसरीकडे, बचाव पक्षाने हा संबंध परस्पर संमतीने झाल्याचा दावा केला. नातेसंबंध तुटल्यानंतर तरुणीने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही बचाव पक्षाने केला. तसेच तिने तिच्या पूर्वीच्या वैयक्तिक नातेसंबंधांची माहिती लपवली असल्याचेही म्हटले.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, दोघांची ओळख ऑनलाइन झाली होती, ते दिल्लीत एकत्र राहिले होते आणि त्यांच्यात शारीरिक संबंधही झाले होते. मात्र लग्नाचे आश्वासन खरे होते की केवळ फसवणुकीसाठी दिले गेले होते, यावर दोन्ही बाजूंचे मतभेद आहेत.

व्हॉट्सॲपवरील संभाषणांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की, आरोपीने पीडितेला वारंवार ‘फ्युचर वायफी’ आणि ‘वायफी’ असे संबोधले होते. तसेच एकत्र राहण्याचा कालावधी संपल्यानंतर त्याने केलेले वर्तन संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

भारतीय न्याय संहितेतील कलम 69 नुसार लग्न करण्याचा कोणताही हेतू नसताना दिलेल्या खोट्या आश्वासनाच्या आधारे मिळवलेले शारीरिक संबंध हा दंडनीय गुन्हा आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

ऑफलाइन पद्धतीने हॉटेल बुकिंग करण्यापासून ते शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर अचानक पीडितेशी संपर्क तोडण्यापर्यंत आरोपीच्या कृतींमधून सुरुवातीपासूनच खोटे लग्नाचे आश्वासन दिल्याचा प्रथमदर्शनी संशय बळकट होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

या टप्प्यावर आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यास पात्र मानता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.