Ratnagiri News – राजापूर नगरपरिषदेचा कंत्राटदाराला दणका; रस्त्याच्या क्युरिंगकडे दुर्लक्ष, नोटीस बजावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
राजापूर शहर प्रभाग क्र. १ मधील भटाळी मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात आवश्यक असलेल्या क्युरिंग प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर राजापूर नगरपरिषदेने संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
नगरपरिषदेने १६ जून २०२६ रोजी दिलेल्या नोटीसनुसार, साईनगर, राजापूर येथील कंत्राटदार नासिर हसन मुजावर यांना हा खुलासा मागविण्यात आला आहे. नगरपरिषदेने १७ मार्च २०२६ रोजी दिलेल्या कार्यारंभ आदेशानुसार संबंधित रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, कामाची पाहणी केली असता काँक्रिट रस्त्यावर आवश्यकतेनुसार पाणी मारण्यात आले नसल्याचे आढळून आले.
तज्ज्ञांच्या मते, काँक्रिट रस्त्याची गुणवत्ता, मजबुती आणि टिकाऊपणा कायम राखण्यासाठी क्युरिंगची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाणी न मारल्यास रस्त्यावर तडे जाण्याची तसेच त्याची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने संबंधित कंत्राटदाराला त्वरित क्युरिंगची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.दरम्यान, क्युरिंगची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाचे कोणतेही देयक अदा करण्यात येणार नसल्याचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.नगरपरिषदेच्या या भूमिकेमुळे सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन गंभीर असल्याचे दिसून येत असून स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.