
ICC Women’s T20 World Cup 2026 ची टीम इंडियाने धडाकेबाज सुरुवात केली. इंग्लंडच्या एजबेस्टन मैदानावर रविवारी (14 जून 2026) आपल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा उडवला. स्मृती मानधनाने 68 धावांची दमदार खेळी केली करत दीप्ति शर्माने श्रीलंकेच्या 5 फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला. त्यामुळे टीम इंडियाने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची 106 धावांमध्ये घसरगूंडी झाली आणि टीम इंडियाने सामना जिंकला. एकीकडे टीम इंडियाने पाकिस्तानला लोळवलं आणि ICC नेही पाकिस्तानवर कारवाई केली आहे.
या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सामन्यात संथ गतीने गोलंदाजी केल्यामुळे (स्लो ओव्हर रेट) ICC ने पाकिस्तान संघाला मोठा दंड ठोठावला आहे. निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्यामुळे मॅच रेफरी ट्रुडी अँडरसन यांनी आयसीसीच्या आचारसंहितेनुसार पाकिस्तानी खेळाडूंवर त्यांच्या मॅच फीच्या 5 टक्के इतका दंड आकारला आहे. मैदानावरील पंच क्लेअर पोलोसक आणि जॅकलिन विल्यम्स यांच्यासह तिसऱ्या आणि चौथ्या पंचांनी पाकिस्तानच्या या चुकीची नोंद केली होती. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने आपली चूक आणि आयसीसीने दिलेली शिक्षा कोणत्याही वादाशिवाय मान्य केली आहे, त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणीची आवश्यकता भासली नाही. एका बाजूला पराभव आणि दुसऱ्या बाजूला दंड अशा दुहेरी संकटात सध्या पाकिस्तानी संघ सापडला आहे.






























































