
अतिसंरक्षित श्रेणीत गणना होत असलेल्या ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात कोकण किनारपट्टीचा मोठा हातभार लागत आहे. 2025 – 26 या हंगामात कोकणातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवाच्या 1 हजार 724 घरट्यांची नोंद करण्यात आली असून यामधून 1 लाख 8 हजार 596 ऑलिव्ह रिडले पिल्ले समुद्रात झेपावली. वनविभागाचे कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व स्थानिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.
कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवाचे संवर्धन करण्याची मोहीम जोमाने सुरू असून मादीने समुद्रकिनाऱ्यावर घरटे करून अंडी घातल्यानंतर घरटे तसेच अंड्यांकडे वनविभागाचे कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व स्थानिकांच्या माध्यमातून विशेष लक्ष दिले जात आहे. 2025 – 26 या हंगामात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात 924 घरटी आढळून आली. या घरट्यांमधून 54 हजार 227 पिल्लांनी समुद्रात धाव घेतली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53 हजार 325, रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1 हजार 44 पिल्ले समुद्रात झेपावली.
समुद्री कासवांच्या प्रजातीत ऑलिव्ह रिडले सगळ्यात लहान आहे. त्यांच्या हृदयाच्या आकाराच्या आणि ऑलिव्ह हिरव्या रंगाच्या कवचावरून त्यांना हे नाव पडले आहे. हे कासव प्रामुख्याने उबदार व उष्णकटिबंधीय समुद्रात राहतात.
23 वर्षांपासून मोहीम
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सागरी किनारपट्टीवर गेल्या 23 वर्षांपासून ऑलिव्ह रिडले या कासवांचे संरक्षण आणि संवर्धन मोहीम सुरू आहे. 2003 मध्ये नामशेष होण्याच्या मार्गावरील ऑलिव्ह रिडले या कासवाची 254 पिल्ले कोकण किनारपट्टीवर जन्माला आली. त्यानंतर चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संघटनेचे संस्थापक भाऊ काटदरे यांनी सहकाऱ्यांच्या माध्यमातून ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षण, प्रजोत्पादन आणि संवर्धन यासाठी मोहीम सुरू केली. सद्यस्थितीत वनविभागाचे कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व स्थानिकांच्या सहकार्यामुळे ही मोहीम जोमाने सुरू आहे.

























































