
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सावर्डे येथील महावितरण कार्यालयाला भेट देत अधिकाऱ्यांकडे विविध प्रश्न उपस्थित केले.
उपकार्यकारी अभियंता खोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया, ग्राहकांची संमती, तसेच पूर्वसूचना याबाबत माहिती मागितली. मुख्यमंत्री यांनी स्मार्ट मीटर बसविणे ऐच्छिक असल्याचे जाहीर केले असताना काही ठिकाणी ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर बदलले जात असल्याच्या तक्रारींकडेही त्यांनी लक्ष वेधले.
तसेच बिल भरण्यास विलंब झाल्यास स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित होतो का, यासह विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागण्यात आले. ग्राहकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी महावितरणने जनजागृती करावी आणि कोणतीही कार्यवाही करताना ग्राहकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घरमालकांच्या माहितीशिवाय अथवा संमतीशिवाय मीटर बसविण्याचे प्रकार होणार नाहीत, तसेच संबंधितांना योग्य सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली.
या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख संदीप राणे, विभागप्रमुख सागर सावंत, संघटक सुभाष डिके, माजी विभागप्रमुख संजय कोकाटे, शाखाप्रमुख अशोक चव्हाण, विवेक सुर्वे, राजेंद्र गुरव, निलेश डिके, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील गुरव, नियाज चिकटे, विनायक वास्कर, युवासेना उपतालुकाप्रमुख भूपेश सावर्डेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.




























































