
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शाळांमध्ये आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा या हिंदुस्थानी वंशाच्या असणे आवश्यक आहे. दैनिक जागरणने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सीबीएसईने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (२०२०) आणि एनसीएफ (२०२३) नुसार भाषा शिक्षणात हा मोठा बदल केला आहे. हे नवीन नियम १ जुलैपासून लागू होणार आहे. यापूर्वी सीबीएसईने एप्रिल महिन्यापासून सहावीच्या वर्गातही तीन त्रिभाषा सूत्र लागू केला होता. सीबीएसई शाळांमध्ये आता नववी आणि दहावीत तीन भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. या बदलासंदर्भात सीबीएसईने १५ मे २०२६ रोजी सर्व शाळांना एक परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे.
नियमानुसार, जर एखाद्या विद्यार्थ्याला परदेशी भाषा शिकायची इच्छा असेल, तर तो ती तिसरी भाषा म्हणून तेव्हाच निवडू शकेल. जेव्हा त्याच्या उर्वरित दोन भाषा हिंदुस्थानी असतील. अन्यथा परदेशी भाषेला चौथी अतिरिक्त भाषा म्हणून शिकवले जाईल.
सीबीएसईने म्हटले आहे की, भाषा शिक्षण हे एनसीईआरटीच्या नवीन अभ्यासक्रमानुसारच दिले जाईल. जोपर्यंत इयत्ता नववीसाठी त्रिभाषेची वेगळी पुस्तके उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या भाषेसाठी इयत्ता सहावीच्या पुस्तकाची २०२६-२७ ची आवृत्ती वापरतील.
























































