Ratnagiri News – दापोली किनारपट्टीच्या असुविधांची गाज सरकार ऐकणार तरी कधी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटकांची प्रथम पसंती असलेला दाभोळ ते केळशी हा 32 किमीचा समृद्ध किनारपट्टीचा भाग आज अनेक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पर्यटकांच्या टिकेचा धनी ठरत आहे. या परिसरातील ऐतिहासिक बंदरे, किल्ले, स्वच्छ समुद्रकिनारे आणि प्रसिद्ध देवस्थानांमुळे येथे वर्षभर पर्यटकांचा मोठा ओघ असतो. मात्र रस्ते, वीज, पाणी, चेंजिंग रूम, पार्किंग आणि सुरक्षेसाठी वॉच टॉवर यांसारख्या सागरी पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधांचा येथे प्रचंड अभाव आहे. गावांची अंतरे आणि दिशा दर्शवणारे माहिती फलकही नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून, वारंवार मागण्या करूनही शासन स्तरावर याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक आणि छोट्या पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वास्तविक पाहता, दाभोळ ते केळशी दरम्यानच्या किनारपट्टीवर स्थानिकांनी आणि व्यावसायिकांनी रिसॉर्ट्स, हॉटेल्स, आणि ‘न्याहारी-निवास’ (होमस्टे) योजनेच्या माध्यमातून स्वबळावर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करून हा पर्यटन व्यवसाय विस्तारला आहे. मात्र, शासनाकडून मिळणाऱ्या पायाभूत सुविधांच्या वानवेमुळे आता हा स्थानिक रोजगार आणि पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे सरकारने केवळ आश्वासने न देता, औद्योगिक क्षेत्राच्या धर्तीवर पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या सर्व मुबलक सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात आणि या किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थाने उभारी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.