तिबेटमध्ये चीनची दडपशाही; पवित्र धार्मिक स्थळे केली उद्ध्वस्त, घरांवर सक्तीने फडकवले चिनी झेंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनने हैनान तिबेट स्वायत्त प्रशासकीय क्षेत्रात दडपशाही मोहीम अधिक तीव्र केली आहे. तिबेटी धार्मिक प्रतीके, सांस्कृतिक परंपरा आणि स्थानिक सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष करत चीनने तिबेटी जनतेला सक्तीने चिनी व्यवस्थेत सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘तिबेट टाईम्स’च्या हवाल्याने वृत्तसंस्था ANI ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

एप्रिल २०२६ मध्ये चिनी अधिकारी शिओंग युआनलाई यांची या प्रांताचे कम्युनिस्ट पार्टी सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या कारवाईला प्रचंड वेग आला आहे. चबचा, त्रिका, मंगरा, बा आणि ड्रॅगकर यांसारख्या विविध भागांमध्ये चिनी अधिकाऱ्यांनी अत्यंत जाचक उपाययोजना लागू केल्या आहेत.

वृत्तानुसार, तिबेटी बौद्ध धर्माची महत्त्वाची प्रतीके असलेले शेकडो पवित्र मणी स्टोनचे ढिगारेजाणीवपूर्वक नष्ट करून पुरण्यात आले आहेत. वृत्तात एका सूत्राने दावा केला आहे की, या क्षेत्रातील ९० टक्क्यांहून अधिक मणी स्टोनची बांधकामे आधीच हटवण्यात आली आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या वांशिक धोरणांचा प्रसार करून आणि धार्मिक परंपरांपेक्षा राज्याची सत्ता सर्वोच्च असल्याचे सांगून अधिकारी या कारवाईचे समर्थन करत आहेत.

ही दडपशाही केवळ सार्वजनिक स्थळांपुरती मर्यादित नसून खासगी घरांपर्यंतही पोहोचली आहे. अनेक समुदायांमधील घरांवरील प्रार्थना ध्वज, विंड-हॉर्स ध्वज आणि घरांच्या प्रवेशद्वारावरील पारंपारिक बॅनर फाडून जाळण्यात आले आहेत. रहिवाशांना त्यांच्या घराच्या छतावरील पारंपारिक आणि धार्मिक चिन्हे हटवून त्याऐवजी सक्तीने चीनचा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यास भाग पाडले जात आहे.