पेपरफुटी रोखण्याच्या नावाखाली कॉमेडी सर्कस, टेलिग्राम बंदी आणि हवाई दलाच्या वापरावर अरविंद केजरीवालांचा सरकारला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटी रोखण्याच्या उपाययोजनांवरून आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेपर पोहोचवण्यासाठी आधी हवाई दलाच्या विमानांचा वापर आणि आता टेलिग्राम ॲपवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत धक्कादायक असल्याचे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. या उपाययोजना म्हणजे एक कॉमेडी सर्कस असून सरकारच्या हेतूवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच ही संपूर्ण व्यवस्था बदलायची असेल, तर जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. X वर एक व्हिडीओ पोस्ट करत ते असे म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की, सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्राम ॲपवर बंदी घातली आहे. हे ऐकून लोकांना हसू येत नाही का? आधी ते म्हणाले होते की, आम्ही पेपर हवाई दलाच्या विमानाने पोहोचवू आणि आता टेलिग्रामवर बंदी घातल्याचे सांगत आहेत. यामुळे पेपरफुटी थांबेल का, असा सवाल करत त्यांची नियतच खराब असल्याचे केजरीवाल म्हणाले.

पेपरफुटीचा हा धंदा अब्जावधी रुपयांचा असून याचा पैसा थेट वरपर्यंत पोहोचतो, असा दावा केजरीवाल यांनी केला. यावेळी त्यांनी खासदार आणि आमदारांच्या खरेदी-विक्रीचा मुद्दाही उपस्थित केला. नुकतेच टीएमसीचे अनेक खासदार-आमदार विकत घेतले गेले आणि आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू असल्याचे ते म्हणाले. एका-एका खासदाराला ५०-५० कोटी रुपये दिले जात असल्याचे ऐकण्यात आले असून, खासदारांना फोडण्यासाठी हा पैसा कुठून येत आहे, असा सवाल त्यांनी विचारला. जर पेपरफुटीचा हा धंदा बंद झाला, तर खासदार आणि आमदार विकत घेण्यासाठी पैसा कुठून येणार, असा घणाघात त्यांनी केला. जोपर्यंत जनता एकत्र येऊन रस्त्यावर उतरत नाही, तोपर्यंत पेपरफुटी अजिबात थांबणार नाही आणि ही संपूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल, असे ते म्हणाले.