
कितीही अपयश आले तरी मनात जिंकण्याची जिद्द असेल तर यश हमखास मिळतेच. अशीच एक जिद्दीला सलाम करणारी अभिमानास्पद बाब मेरठमध्ये घडली आहे. अवघ्या दोन गुणांनी जेईई परीक्षेत अपयश आल्यानंतरही मेरठच्या संकेत कुमारने जिद्द सोडली नाही. युट्यूबवरून अभ्यास करत मेरठच्या तरुणाने अखेर आपलं स्वप्न पूर्ण करत गगनभरारी घेतली. संकेतची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ/अभियंता म्हणून निवड झाली आहे.
संकेतचा 2021 मध्ये JEE अॅडव्हान्स्ड परीक्षेचा कट-ऑफ थोडक्यात हुकला. यानंतर संकेतने ‘गॅप इयर’ घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याऐवजी ‘स्व-अभ्यासा’वर भर दिला. परीक्षेच्या तयारीसाठी संकेतने यूट्यूबवरील व्याख्याने व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेतला. अखेर एक वर्षाने संकेतच्या जिद्दीचे फळ त्याला मिळाले. त्याने JEE मेन आणि JEE अॅडव्हान्स्ड या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. यानंतर तिरुवनंतपुरम येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ (IIST) मध्ये प्रवेश मिळवला, तेथे त्याने ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेतले.
संकेतने ‘व्हायब्रेशन्स’ (कंपने) आणि ‘अकौस्टिक्स’ (ध्वनीशास्त्र) या विषयांची निवड केली. त्याच्या बॅचमध्ये हा विषय निवडणारा तो एकमेव विद्यार्थी होता. अभ्यासादरम्यान, त्याला जपानमधील ‘शिनरा इंक.’ (Shinra Inc.) या कंपनीसोबत एका प्रगत अभियांत्रिकी संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. 8.2 CGPA सह पदवी पूर्ण केल्यानंतर, संकेतची ISRO मधील मुलाखतीसाठी निवड झाली आणि अखेरीस त्याची शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली.
संकेतने या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले आहे. कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळेच तो हे यश संपादन करू शकला, असे त्याचे म्हणणे आहे. ‘गॅप इयर’ घेण्याच्या त्याच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, तरीही त्याचे कुटुंब संपूर्ण काळात त्याच्या पाठीशी उभे राहिले. विशेषतः त्याच्या भावाने त्याला मोलाची आर्थिक मदत केली, असे संकेत पुढे म्हणाला.1
संकेतच्या यशाबाबत त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. पालकांनी आपल्या मुलांच्या आकांक्षांवर विश्वास ठेवा आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना पाठिंबा द्या, असे आवाहन संकेतच्या आई-वडिलांनी केले आहे.


























































