
मुंबईत चर्चगेट विरार लोकलमध्ये अंधेरी बोरिवली स्थानकादरम्यान माथेफिरूने दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादावरून एका तरुणाला धारदार सुऱ्याने भोसकले. या चाकू हल्ल्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव आहे. लोकल पुढील स्थानकात थांबताच माथेफिरू उतरून निघून गेला. या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सहा पथकं तयार केली असून ते आरोपीचा शोध घेत आहेत. मयंक हा अंधेरी येथील वेस्टसाईडच्या दुकानात कामाला होता. मंगळवारी रात्री मयंकने अंधेरी स्थानकावरून विरारला जाणारी लोकल पकडली. मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने पावसाचे पाणी लोकलमध्ये येत होते. त्यामुळे मयंकने दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला दरवाजा बंद करायला सांगितला. त्यावरून त्या दोघांत वाद झाले. त्यानंतर दरवाजात उभ्या व्यक्तीने त्याच्याकडील चाकूने मयंकवर वार केले. त्यानंतर हल्लेखोर बोरिवली स्थानकात उतरून पळून गेला. त्यानंतर इतर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने मयंकला शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.



























































