रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात कुमारी मातेने दिला बाळाला जन्म, अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

आदिवासीबहुल अकोले तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. कोतूळ येथील एका 18 वर्षीय कुमारी मातेने नाशिक येथील रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सोमवारी (दि. 22) कोतूळ परिसरातील एक अविवाहित तरुणी पोटदुखीची तक्रार घेऊन खासगी रुग्णालयात आली होती. तपासणीदरम्यान ती रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात गेली. स्वच्छतागृहाचा वापर करतानाच तिने तिथेच एका मुलाला जन्म दिला. या नवजात बाळाचे वजन अंदाजे अडीच किलो असून, त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनेनंतर संबंधित डॉक्टरांनी तरुणीची चौकशी केली असता ती अविवाहित असल्याचे समोर आले. तसेच बाळाचा पिता हा अकोले तालुक्यातीलच असल्याची माहिती तिने दिली. याप्रकरणी डॉक्टरांनी पोलीस ठाण्याला माहिती दिली. यावरून अकोलेचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. यावरून पोलिसांनी पोक्सोअंतर्गत सबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप हजारे तपास करीत आहेत. वारंवार घडणाऱया या घटनांमुळे तालुक्यातील अल्पवयीन मुलींची सुरक्षा, बालविवाह रोखणे यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षभरात 55 कुमारी मातांनी दिला बाळाला जन्म

n अकोले तालुक्यात कुमारी माता व बालविवाह रोखण्याचे काम चिंताजनक आहे. गेल्या वर्षी अकोले तालुक्यातून 55 अल्पवयीन मातांनी बाळांना जन्म दिल्याचा अहवाल समोर आला होता. त्याची चौकशी सुरू असतानाच कोतूळ येथील घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवडय़ात कळस, करंडी आणि देवठाण परिसरातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या 2 स्वतंत्र घटना उघडकीस आल्या होत्या.