FIFA World Cup 2026- विक्रमांच्या ग्रहावरचा खिलाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<मंगेश वरवडेकर>>

फुटबॉलमध्ये देव असतो का, यावर वाद होऊ शकतो. पण देव फुटबॉल खेळला असता तर तो कदाचित मेस्सीसारखाच दिसला असता. आज तो वर्ल्ड कपमध्ये ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत आघाडीवर आहे. वयाच्या 39 व्या वर्षीही तो युवा बचावपटूंना चकवतोय. वर्ल्ड कपमध्ये  सर्वाधिक गोलांचा मिरोस्लाव क्लोजाचा विक्रम मोडून त्याने पुन्हा जगाला आठवण करून दिली आहे की, काही खेळाडू निवृत्तीच्या दिशेने जात नाहीत, तर अमरत्वाच्या दिशेने जात असतात. तो त्याच मार्गावर आहे.

कालचा मेस्सीचा 17 वा गोल फुटबॉलच्या इतिहासाच्या पुस्तकात सोन्याच्या अक्षरांनी कोरला गेला. तो सुवर्ण क्षणही सर्वांनी अनुभवला. गोल झाल्यानंतर मेस्सीने दोन्ही हात आकाशाकडे उंचावले. सहकारी खेळाडूंनी त्याला मिठीत घेतलं. त्याक्षणी त्याच्या चेहऱयावर दिसणारे भाव हे फक्त आनंदाचे नव्हते. त्यात वीस वर्षांचा प्रवास होता. त्यात रोसारिओच्या धुळीच्या मैदानांची आठवण होती. त्यात वाढीच्या हार्मोनच्या इंजेक्शनची वेदना होती. त्यात बार्सिलोनासाठी घर सोडताना आलेलं एकटेपण होतं. त्यात हरलेल्या फायनल्सचे अश्रू होते आणि त्यात कतारमध्ये उंचावलेला विश्वचषकही होता.

मेस्सीची गोष्ट ही खरंतर एका गोलपासून सुरू होत नाही. ती सुरू होते अर्जेंटिनातील रोसारिओ शहरात. तिथे एक बुटका, शांत, लाजरा मुलगा ग्रँडोली नावाच्या छोटय़ा क्लबसाठी खेळत होता. इतर मुलं चेंडूला लाथ मारत होती. तो चेंडूशी मैत्री करत होता. त्याच्या पायाला चेंडू असा चिकटत असे की जणू तो त्याचा पाळीव प्राणी आहे.

मात्र नियतीने त्याच्यासमोर एक भलामोठा अडथळा उभा केला. वाढीच्या हार्मोनची कमतरता. शरीर वाढत नव्हतं. अनेकांची स्वप्नं इथेच संपली असती. पण महान खेळाडूंच्या आयुष्यात अडथळे हे शेवट नसतात, ती प्रस्तावना असते. वयाच्या तेराव्या वर्षी तो बार्सिलोनाला गेला आणि पुढे फुटबॉलच्या इतिहासात जे घडलं, त्याला चमत्कार म्हणण्याशिवाय दुसरा शब्द नाही. त्या काळात अनेक स्वप्नं मरतात. मेस्सीचं स्वप्न मात्र जगत राहिलं. कारण देव जेव्हा एखाद्या कलाकाराला पृथ्वीवर पाठवतो, तेव्हा त्याची परीक्षा आधी घेतो. मेस्सीच्या आयुष्यात देवाने ती कसून घेतली आणि मग एका दिवशी बार्सिलोनाच्या स्काऊट्सनी त्या मुलाला पाहिलं. त्याच्या पायाशी चेंडू होता. पण त्यांना चेंडू दिसला नाही. त्यांना भविष्यातील इतिहास दिसला.

म्हणतात, त्याचा पहिला करार एका नॅपकिन पेपरवर लिहिला गेला. कल्पना करा… एका कागदाच्या तुकडय़ावर लिहिलेला करार पुढे अब्जावधी लोकांच्या भावना नियंत्रित करणार होता. बार्सिलोनात पोहोचल्यानंतर मेस्सीने मागे वळून पाहिलं नाही. बाकी खेळाडू मैदानावर धावत होते. मेस्सी मैदानावर चित्र काढत होता. झावी, इनिएस्ता आणि मेस्सी ही त्रिमूर्ती म्हणजे फुटबॉलमधील ब्रह्मा, विष्णू, महेशच होती. त्यांचं पासिंग पाहताना असं वाटायचं की, चेंडूला दोरा बांधलाय आणि तो त्यांच्या इशाऱ्यावर नाचतोय.

मेस्सीचं सारं अद्भुत आहे. बार्सिलोनासाठी 778 सामने. 672 गोल. दहा ला लिगा. चार चॅम्पियन्स लीग. सात कोपा डेल रे आणि 2012 मध्ये एका कॅलेंडर वर्षात तब्बल 91 गोल!

हा आकडा फुटबॉलमधला एव्हरेस्ट आहे. तो विक्रमांच्या ग्रहावरचा खिलाडी आहे. सबसे बडा खिलाडी आहे. अनेक जण बेस कॅम्पपर्यंत पोहोचतील. पण शिखरावर झेंडा रोवणं अजूनही अशक्यच वाटतं. मात्र या कथेत एक दुःखद वळणही होतं.

बार्सिलोनासाठी तो देव होता, पण अर्जेंटिनासाठी? तिथे लोक विचारत होते, मॅराडोनासारखा मोठा आहे का? हा प्रश्न मेस्सीच्या छातीवर खुपसलेल्या सूर्यासारखा होता. 2014 विश्वचषक अंतिम फेरीत पराभव.

कोपा अमेरिकेच्या फायनलमध्ये पराभव. पुन्हा पराभव. आणखी पराभव. 2016 मध्ये चिलीविरुद्ध पेनल्टी चुकली. मेस्सी कोसळला. त्याने निवृत्ती जाहीर केली. त्यादिवशी अर्जेंटिनात अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. फुटबॉलचा देव रडत होता आणि भक्त हतबल झाले होते. पण महान खेळाडू पराभवाने संपत नाहीत. ते पराभवातून जन्म घेतात. अर्जेंटिनाने हाक दिली. चाहत्यांनी विनवणी केली. देशाने प्रेम दिलं आणि मेस्सी परतला. त्याची ती पुनरागमनाची कथा म्हणजे रामाच्या वनवासानंतरच्या अयोध्या परतीसारखी होती.

2021 मध्ये कोपा अमेरिका जिंकला. अर्जेंटिना 28 वर्षांनी मोठा किताब जिंकत होता. मग आली 2022 ची कतारची रात्र. फुटबॉल विश्वातील सर्वात सुंदर पटकथा. फ्रान्सविरुद्धचा अंतिम सामना. संपूर्ण जग श्वास रोखून बसलं होतं. मेस्सीने दोन गोल केले. अर्जेंटिना विश्वविजेता झाला आणि एका क्षणात फुटबॉलमधील सर्व अपूर्ण चर्चा संपल्या. जगाने एक फोटो पाहिला. मेस्सी विश्वचषकाला मिठी मारून उभा होता. त्या फोटोमध्ये आनंद होता, संघर्ष होता, अश्रू होते आणि एक आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान होतं.

आज त्याच्या नावावर 8 बॅलन डी’ओर आहेत. 6 गोल्डन शू आहेत. 48 ट्रॉफी आहेत. 900 पेक्षा जास्त गोल आहेत. 400 हून अधिक असिस्ट आहेत, पण त्याची सर्वात मोठी कमाई ही आकडेवारी नाही. त्याची सर्वात मोठी कमाई म्हणजे लोकांचं प्रेम. आजही तो इंटर मियामीसाठी खेळतो. आजही हॉलीवूड स्टार्स त्याला पाहायला येतात. आजही मुलं त्याच्यासारखे ड्रिबल करण्याचा प्रयत्न करतात आणि आजही फुटबॉलचा चेंडू त्याच्या पायाशी आल्यावर जग श्वास रोखून बसतं. काही खेळाडू विक्रम करतात. काही ट्रॉफी जिंकतात. काही सामने जिंकतात. पण काही दुर्मिळ लोक काळालाच जिंकतात. मेस्सी हा त्या शेवटच्या जातीचा आहे.

पण खरं सांगायचं तर… रोसारिओच्या रस्त्यावर चेंडूला लाथ मारणारा तो छोटा मुलगा अजूनही त्याच्या आत जिवंत आहे. फरक एवढाच… पूर्वी तो चेंडूच्या मागे धावत होता. आता संपूर्ण फुटबॉल इतिहास त्याच्या मागे धावतोय!