गुरु रंधावाच्या जिमवरील गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; चकमकीनंतर लॉरेन्स गँगचे दोन शूटर जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकप्रिय पंजाबी गायक गुरू रंधावा याच्या जिमवर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये आता दिल्ली पोलिसांना यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चकमकीनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित दोन संशयित शूटरांना अटक केली आहे. हकीकत आणि सागर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, ते हरियाणातील सोनीपतचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील कारवाईदरम्यान हे दोघे आणखी एका गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पश्चिम विहार परिसरात त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई करत दोघांनाही जेरबंद केले. या चकमकीत दोन्ही आरोपींच्या पायाला गोळ्या लागल्या.

पोलिसांनी आरोपींकडून पाकिस्तानी बनावटीची शस्त्रे आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. प्राथमिक तपासात हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई आणि अनिल पंडित गँगशी संबंधित असल्याचे समोर आले असून, गुरु रंधावाच्या जिमवरील गोळीबारात त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. 11 जून 2026 रोजी दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातील गुरु रंधावाच्या ‘24 अवर फिटनेस’ जिमवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि तपासाची सूत्रे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे सोपविण्यात आली. असे वृत्त आज तक ने दिले आहे.

हल्ल्याची जबाबदारी नंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावरील एका कथित पोस्टद्वारे स्वीकारल्याचा दावा करण्यात आला. तसेच व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये गुरु रंधावा अभिनेता सलमान खानच्या जवळचा असल्यानेच त्याला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. सदर प्रकरणात यापूर्वी 17 जून रोजी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमन आणि तुषार या दोन आरोपींना अटक केली होती. तपासादरम्यान हे दोघेही गोळीबाराच्या कटात सहभागी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी गँगच्या नेटवर्कचा तपास अधिक वेगाने सुरू ठेवला होता.