शिवसैनिकांची आणि मतदारांची माफी मागण्यासाठी हा दौरा – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी दौरा केला म्हणून हे खासदार निवडून आले होते, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानी गद्दारांना सुनावले. तसेच इथल्या मतदारांनी केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा पाहून आणि मशाल चिन्ह पाहून आम्ही जो उमेदवार दिला त्याला निवडून दिला. त्या शिवसैनिकांची आणि मतदारांची माफी मागायला मी हा दौरा सुरू केला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसैनिक आणि पत्रकार माझ्यासोबत आहेत. गेल्या काही दिवसांत फुटलेल्या खासदारांची भाषा आणि वर्तन तुम्ही पाहू शकता. इतकी वर्ष बुरखे पांघरून हे लोक शिवसेनेत राहिली कशी याची मला लाज वाटते. या खासदारांकडून पत्रकारांना जी वर्तणूक मिळाली ही आपल्या संस्कृती शोभणारी नाही. एखाद्याला राग आला तर तो राग व्यक्त करण्याची भाषा आपण समजू शकतो. पण शिवीगाळ करणे ही आपल्या महाराष्ट्रची संस्कृती नाही. गद्दारी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघात शिवसैनिकांना भेटण्यासाठी हा दौरा आहे. इथल्या मतदारांनी केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा पाहून आणि मशाल पाहून आम्ही जो उमेदवार दिला त्याला निवडून दिला. त्या शिवसैनिकांची आणि मतदारांची माफी मागायला मी हा दौरा सुरू केला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पक्षातून फुटीसाठी निधी मिळाला हे त्यांनी स्वतःच मान्य केले आहे. जेव्हा आमदार फुटले होते तेव्हा 50 खोके एकदम ओके ही घोषणा गावागावांत पोहोचली होती. विदर्भात बैल पोळ्यांच्या दिवशी बैलांवर ही घोषणा लिहिली होती. आमदारांना तेव्हा 50 कोटी दिले गेल्याचे बोलत असतील तर खासदारांना किती दिले असतील, याचा हिशोब लावा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ज्या वेळेला खासदार निवडून आले तेव्हा मी दौरा केला होता. पण मी दौरा केला होता म्हणूनच हे निवडून आले होते. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी मला आता निवेदन दिले होते की पीक विम्याचा अजून पत्ता नाही, हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, पण शिवसेनेतून निवडून आलेले खासदारांना भरघोस हमीभाव मिळाला आहे. त्यामुळे या उपटसुंबांनी आमच्यावर टीका करण्याचे धाडस करू नये, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.